दोन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर अनुदान मिळणार

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 31 ऑगस्ट 2019 पूर्वी कांदा अनुदानाची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे.   

दोन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर अनुदान मिळणार

नाशिक (लासलगाव)  :  गेल्यावर्षी कांदा बाजारभावातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर शासनाने 200 क्विंटलपर्यंतच्या कांद्यावर 200 रुपये प्रति क्विंटल इतकं अनुदान जाहीर केले होते. दुसऱ्या टप्प्यातील 16 डिसेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019 या कालावधीत विक्री झालेल्या कांद्याला 387 कोटी 30 लाख 31 हजार रुपयांचे अनुदान पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आले आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ने याबाबतची बातमी दाखवली होती. त्याची दखल घेत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 31 ऑगस्ट 2019 पूर्वी कांदा अनुदानाची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे.

कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला शासनाने मदत करावी, म्हणून निफाडचे आमदार अनिल पा. कदम, चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या नेतृत्वाखालील लासलगांव बाजार समितीच्या शिष्टमंडळाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समक्ष भेट घेऊन मागणी केली होती.

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या/खाजगी बाजार समितीमध्ये 1 नोव्हेंबर 2018 ते 15 डिसेंबर 2018 या कालावधीत कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिलं होतं. याअंतर्गत 1 लाख 60 हजार 697 लाभार्थी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 114 कोटी 48 लाख रुपये जमा करण्यात आले.

राज्य शासनाने अनुदान कालावधीत वेळोवेळी वाढ करुन ती मुदत 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत वाढवली होती. राज्यातील बाजार समित्यांनी 16 डिसेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019 या कालावधीत कांदा शेतकऱ्यांकडून अनुदान मागणी अर्ज आणि अनुषंगिक कागदपत्र संकलीत करुन त्याच्या विहीत नमुन्यातील याद्या संबंधित लेखापरिक्षकांनी तपासणी करुन शासनाला मे 2019 मध्ये सादर केल्या होत्या. त्यानुसार, पणन संचालक पुणे यांनी राज्य सरकारकडे कांदा अनुदान वितरित करण्यासाठी 387 कोटी 30 लाख 31 हजार रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला आज पावसाळी अधिवेशनात पुरवनी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलं

त्यानुसार, 16 डिसेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019 या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केलेल्या 1,91,115 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 199.57 कोटी रुपये शासनाकडून जमा होणार आहेत. एकट्या लासलगाव बाजार समितीच्या 30,594 लाभार्थी शेतकऱ्यांना 34.44 कोटी रुपये अनुदान रक्कम मिळणार आहे. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *