मोठी बातमी ! नमाज सुरू असताना मोठा स्फोट, मशिदीत पडला रक्ताचा सडा, 8 जणांचा जागीच मृत्यू
Syria Homs Mosque Blast : सीरियातील होम्समधील एका मशिदीत स्फोट झाला आहे. या घटनेत 8 जणांचा मृत्यू जाला आहे, तसेच अनेकजण या घटनेत जखमी झाले आहेत.

सीरियातून मोठी बातमी समोर आली आहे, होम्समधील एका मशिदीत स्फोट झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अलावाइट अल्पसंख्याक समुदायाच्या मशिदीत हा स्फोट झाला असून या घटनेत 8 जणांचा मृत्यू जाला आहे, तसेच अनेकजण या घटनेत जखमी झाले आहेत. इमाम अली बिन अबी तालिब मशिदीत झालेल्या स्फोटामुळे सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. मदतकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे.
मशिदीत भीषण स्फोट
होम्समधील मशिदीत झालेल्या या स्फोटाबद्दल स्थानिक अधिकारी इस्साम नामेह यांनी रॉयटर्सला सांगितले की, शुक्रवारी दुपारच्या नमाजाच्या वेळी हा स्फोट झाला. या काळात मशिदीत मोठी गर्दी असते. त्यामुळे अनेक लोकांवर या स्फोटाचा परिणाम झाला आहे. सीरियाची सरकारी वाहिनी अरब न्यूजने या स्फोटाचे फोटो शेअर केले आहेत. यात या मशिदीत रक्ताचे सडे पडलेले दिसत आहेत. तसेच अनेक भिंतींना तडे गेले असून खिडक्या तुटलेल्या आहेत. यावरून या स्फोटाची भीषणता समोर येत आहे.
21 लोक जखमी
सुरक्षा दलांचा हवाल्याने अरब न्यूजने म्हटले की, या घटनेच्या प्राथमिक तपासात मशिदीत स्फोटक यंत्र लावण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर आता परिसराला वेढा घालण्यात आला आहे. सीरियाच्या आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी नजीब अल-नासन यांनी सांगितले की, या घटनेत 8 लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच 21 लोक जखमी झाले आहेत. हे आकडे प्राथमिक आहेत, आगामी काळात मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढू शकतो.
सरकारकडून घटनेचा निषेध
सीरियाच्या या घटनेचे फुटेज समोर आले आहे. यात बचाव कर्मचारी आणि सुरक्षा दल संपूर्ण मशिदीत मदतकार्य करताना दिसत आहेत. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या घटनेनंतर सीरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे निवेदन जारी केले आहे. सीरिया सरकारने या घटनेला मानवी आणि नैतिक मूल्यांवर भ्याड हल्ला असल्याचे म्हटले आहे. यामुळे सीरियाला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी गेल्या काही वर्षांपासून सत्तेत असलेले राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना पदावरून खाली खेचण्यात आले होते, मात्र त्यानंतर सीरियामध्ये सांप्रदायिक हिंसाचार वाढला आहे. अल-असद स्वतः अलावाइट पंथाचे आहेत. त्यांची सत्ता गेल्यानंतर सीरियामध्ये सुन्नी मुस्लिम बहुसंख्य सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे असे हल्ले वाढले आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला घडलेल्या एका घटनेत दोन अमेरिकन सैनिक ठार झाले होते.
