निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत का?; उद्धव ठाकरे कडाडले
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना निवडणुकीच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच निवडणूक आयोगावरही निशाणा साधला आहे.

भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गट अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. महायुती सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी आज शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती, या आंदोलनानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी सरकार तसेच निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणूक आयोगाविरोधात लढाई सुरू असताना सरकार का मध्ये पडतंय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
नेमकं काय म्हणाले ठाकरे?
‘जी मतं आपल्या विरोधात आहे त्याची छाटणी करायची आणि मतांची चोरी करून आपली मते वाढवायची. हा लोकशाहीवरचा दरोडा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटही काढलं. बॅलेटवर निवडणुका घ्या अशी मागणी होती. व्हीव्हीपॅटवरच्या रिसीटची मोजणी कधीच झाली नाही, सिम्बॉलिक मोजणी झाली. आता व्हीव्हीपॅटही काढलं, निवडणूक आयोग एक एक निर्णय मर्जीने घेत आहे. निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपतींपेक्षा मोठे झाले का? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, केंद्र सरकारने केलेला तमाशा लांच्छनास्पद आहे. खासदारांना सांगितलं की निवडणूक आयोगाकडे नेतो आणि पोलीस स्टेशनला नेलं असं कळलं. हे दरोड्याचं काम झालं आहे. पंतप्रधान आणि इतरांनी समोरासमोर बसून जे राहुल गांधींनी सादरीकरण दिलं ते समजून घेतलं पाहिजे. देशभरात मुद्दा लावून धरला पाहिजे. देशाच्या लोकशाहीचा मुद्दा आहे, सहा महिन्यात 45 लाख मते वाढली. ती आली कुठून? त्यामुळे तुम्ही नावं तपासून घ्या, आपल्या पत्त्यावर आणखी काही मतदार घुसवले का ते पाहा, असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला आहे.
सरकारने लोकशाहीला काळीमा फासला आहे. आयोगाच्या विरोधात लढाई आहे. पण यात भाजप का पडतंय हे उघड झालं आहे. राहुल गांधींनी मतांची चोरी कशी झाली हे सप्रमाण दाखवून दिलं आहे. आयोग त्यांना प्रतिज्ञापत्र मागत आहे, हा कोणता उफराटा कारभार आहे? असंही यावेळी ठाकरे यांनी म्हटलं आहे.
