टीव्ही9 मराठीच्या Exclusive मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात अचानक अश्रू, काय घडलं?

टीव्ही9 मराठीच्या विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरे भावूक झाले. महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत भाजपने मातोश्रीला बदनाम करू नये, अशी त्यांची भूमिका होती. बाळासाहेबांनी मोदींना कसे वाचवले, हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. "मातोश्रीने वाचवले नसते तर मोदी दिसले नसते," असे विधान करत त्यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. राजकारणातील सध्याच्या टीकेवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

टीव्ही9 मराठीच्या Exclusive मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात अचानक अश्रू, काय घडलं?
उद्धव ठाकरे भावूक
| Edited By: | Updated on: Jan 10, 2026 | 4:56 PM

महापालिका निवडणुकांसाठी अवघे चार दिवस उरले आहेत. त्यामुळे राज्यात आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. जुने घोटाळे, जुन्या टीका यावरही भाष्य करून भरलेल्या जखमांवरची खपली काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर काही ठिकाणी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर अनेक ठिकाणी मतदारांना भावनिक आवाहनही केलं जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीव्ही9 मराठीला Exclusive मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी उद्धव ठाकरे हे भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्यासारखे झाले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांची नेमकी ही मुद्रा टीव्ही9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांच्या नजरेने टिपली आणि त्यांना थेटच प्रश्न केला. त्यावर उद्धव ठाकरे जे म्हणाले ते मुंबईकरांच्या काळजाला हात घालणारं होतं. काय म्हणाले उद्धव ठाकरे नेमकं?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीव्ही9 मराठीला आज खणखणीत आणि सनसनाटी मुलाखत दिली. टीव्ही9चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांचे थेट प्रश्न आणि उद्धव ठाकरे यांची बेधडक उत्तरे यामुळे ही मुलाखत प्रचंड गाजली. प्रश्न उत्तरांची जुगलबंदी बऱ्याच दिवसानंतर या मुलाखतीच्या निमित्ताने माध्यमांमध्ये पाहायला मिळाली. उमेश कुमावत यांनी जसे रोखठोक प्रश्न विचारले, अडचणीचे प्रश्न विचारले तसेच भावनेला हात घालणारे प्रश्नही विचारले. पण उद्धव ठाकरे यांनी अत्यंत शांत आणि संयमीपणे या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. एका क्षणी तर ते हळवे झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळल्या सारखं दिसलं. उमेश कुमावत यांनी नेमकं हे हेरत त्यांना थेटच विचारलं. तुमच्या डोळ्यात पाणी दिसतंय? तुम्ही भावूक झालात? त्यावर उद्धव ठाकरे यांनीही तितक्याच दिलखुलास आणि दिलदारपणे उत्तर दिलं.

काय म्हणाले ठाकरे?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मातोश्रीचे दरवाजे बंद आहेत का? असा थेट प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. ते म्हणाले, असं काही नाही. माझे दरवाजे कुणाला बंद नाही. पण मातोश्रीची बदनामी करणं थांबवा, आमच्या कुटुंबाला बदनाम करणं थांबवा.

तुम्ही मातोश्री बदनाम का करता? मी तुमच्याबद्दल वैयक्तिक काही बोलत नाही. राजकारणावर बोलत आहे. मी भाजप किंवा अमित शाहांवर टीका करतोय. मोदी मला नकली संतान म्हणाले. ही कोणती संस्कृती? ज्या मातोश्रींनी तुम्हाला वाचवलं, नाही तर मोदी दिसलेच नसते. प्रमोदजी (प्रमोद महाजन) असते तरी मोदी दिसले नसते. प्रमोदजी कर्तबगार माणूस होता. महाजनांना प्रत्येक शहर आणि राज्यांच्या गोष्टी माहीत होत्या. वाजपेयी मोदींना उचलून फेकत होते. तेव्हा बाळासाहेबांनी वाचवलं. त्या बाळासाहेबांच्या मुलाला तुम्ही उचलून फेकलं, असं सांगत असताना उद्धव ठाकरे भावूक झाले. तेव्हा उमेश कुमावत यांनी तुमच्या डोळ्यात पाणी दिसतंय असं म्हटलं. त्यावर, माझ्या डोळ्यात अश्रू नाही. प्रदूषणामुळे झालं असेल, असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं. उद्धव ठाकरेंनी हा सिक्सर लगावताच उमेश कुमावत आणि उद्धव ठाकरे दिलखुलास हसले. त्यानंतर लगेचच मी असा अश्रू ढाळणारा नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.

हे जे काही चाललंय ते…

माझ्या मनात एक आणि ओठावर वेगळं नाही. जे पटत नाही पटत नाही. शत्रूचं असेल तर पटलं म्हणणारा आहे. मित्राचं नाही पटलं तर नाही म्हणून सांगणारा आहे. अशीच अपेक्षा इतरांकडून आहे. माझं नाही पटलं तर मला समजवा. माझे आजोबा, वडील. आजोबा व्यासंगीच होते. आजोबा इतिहासाचे गाढे अभ्यासक. बाळासाहेबांची ओळख करून द्यायची गरज नाही. बाळासाहेब म्हणायचे की, टीक अशी करा की ओरबाडतोय असं वाटता कामा नये. आता हे जे काही चाललंय ते योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.