Uddhav Thackeray : आपल्याला सरकार ताब्यात घ्यावं लागेल, उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य
Uddhav Thackeray : "बिहारमध्ये सांगत आहेत की पंतप्रधानांचं देशावर प्रेम आहे. सर्वात अधिक प्रेम बिहारमध्ये आहे. अशा लोकांच्या हातात पक्ष दिला त्याची जाणीव ठेवा. आपल्याला सरकार ताब्यात घ्यावं लागेल. त्यामुळे सरकार म्हणून एकत्र यावं लागेल"

उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मागच्या महिन्यात अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकऱ्यांची जमीन अक्षरक्ष: खरवडून गेली. शेतकरी पुन्हा शेतीत पीक कसं घेणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. नव्या मातीची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने काही हजार कोटींच पॅकेज जाहीर केलं. त्यातली मोठी रक्कम दिवाळी आधी मिळेल असं सरकारने जाहीर केलं होतं. त्यातली किती रक्कम शेतकऱ्याच्या हातात पडली? शेतकऱ्याला खरच सरकारने मदत केलीय का? हे जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.
“मनरेगातून साडे तीन लाख देणार होते. आम्ही म्हटलं त्यातील एक लाख तरी तुम्ही दिवाळीच्या आत द्या. पण ते दिलं नाही. हे थोतांड सरकार आहे. खोटं बोलून मतांची चोरी, याद्यांमध्ये मतांची चोरी. तुम्ही शेतकरी म्हणून एकवटत नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही. तुम्ही मातीतून कोंब फोडता. शेतकऱ्यांना पाझर नाही फोडू शकत. तुम्ही एक व्हा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. मी राजकारणासाठी आलो नाही. मत मागायला आलो नाही. तुमच्या लढ्यासाठी तुमची साथ मागायला आलो आहे” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री कुठे आहेत?
“बाहेरून मतदान घेऊन आले. जिंकला. अशा आमदाराला लाज वाटली पाहिजे. सरकार येतं जातं. तुम्ही आम्ही जागच्या जागी राहतो. आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे महापूर येऊन गेला. आस्मानी आणि खालून सुल्तानी. यांना खुर्च्या सोडवत नाही. मी फिरतोय. मुख्यमंत्री कुठे आहेत? बिहारमध्ये” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
जेव्हा मी हाक देईन तेव्हा आंदोलनाला या
“बिहारमध्ये सांगत आहेत की पंतप्रधानांचं देशावर प्रेम आहे. सर्वात अधिक प्रेम बिहारमध्ये आहे. अशा लोकांच्या हातात पक्ष दिला त्याची जाणीव ठेवा. आपल्याला सरकार ताब्यात घ्यावं लागेल. त्यामुळे सरकार म्हणून एकत्र यावं लागेल. कर्जमुक्ती झालीच पाहिजे. 50 हजार हेक्टरी मदत दिलीच पाहिजे. ते मिळत नाही. तोपर्यंत सरकारला दार उघडं करायचं नाही. त्यांना दाराच्या बाहेर ठेवू. जेव्हा मी हाक देईन तेव्हा आंदोलनाला या. मी सर्वांना न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
