ऑपरेशन सिंदूरनंतर उद्धव ठाकरे यांची केंद्रीय मंत्र्यासोबत थेट फोनवर चर्चा?; चर्चेचा विषय काय?
भारत सरकारकडून खासदारांचे काही गट तयार करण्यात आले आहेत. खासदारांचं हे शिष्टमंडळ विविध देशांना भेटी देऊन भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका आणि ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देणार आहे, या संदर्भात हे बोलणं झालं.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं, पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली. या कारवाईनंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने खासदारांच्या काही गटांची निर्मिती केली आहे, हे खासदार विविध देशांना भेटी देऊन भारताची ऑपरेशन सिंदूरबाबतची भूमिका मांडणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा या खासदारांच्या गटामध्ये समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांच्यामध्ये फोनवर बोलणं झालं. दहशतवादाविरोधात विविध देशांना भेट देणाऱ्या भारतीय शिष्टमंडळासंदर्भात ही चर्चा झाली, हे शिष्टमंडळ राजकारणाशी संबंधित नसून केवळ दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्यासाठी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, आपण देशाला आवश्यक ते सहकार्य करू असे आश्वासन यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं सरकारला देण्यात आलं आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, सर्वच राजकीय पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवादाविरोधात, लढण्यासाठी पाठिंबा दिला आहे. ‘देशात आम्ही गुप्तचर यंत्रणेतील त्रुटींबद्दल आणि पहलगाममधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न विचारत राहू, पण जागतिक स्तरावर पाकिस्तानस्थित दहशतवादाला उघड करून त्याला एकटे पाडणे आणि नष्ट करणे आवश्यक आहे, अशी शिवसेना ठाकरे गटाची भूमिका असल्याचं यावेळी पक्षाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं.
या कार्यात आम्ही एकत्र आहोत, परंतु अशा शिष्टमंडळांबद्दल पक्षांना अधिक चांगली माहिती दिली जावी, अशी सूचनाही केंद्र सरकारला यावेळी करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पहलगाम ते ऑपरेशन सिंदूर या विषयावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणीही शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं यावेळी करण्यात आली, दहशतवादाविरोधात सुरू असलेल्या लढाईत आम्ही एकजूट आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
भारत सरकारकडून खासदारांचे काही गट तयार करण्यात आले आहेत. खासदारांचं हे शिष्टमंडळ विविध देशांना भेटी देऊन भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका आणि ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देणार आहे.