मनसेच्या शिबिरातून उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी बातमी, राज ठाकरेंच्या मनात दुसरंच काही?

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसेच्या शिबिरातून मोठी बातमी समोर आली आहे.

मनसेच्या शिबिरातून उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी बातमी, राज ठाकरेंच्या मनात दुसरंच काही?
| Updated on: Jul 14, 2025 | 7:02 PM

राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं, पहिली पासून हिंदींची सक्ती नको अशी भूमिका मनसेची होती. मनसेनं आपल्या मागणीसाठी मोठं आंदोलन उभारलं, त्यानंतर या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटानं देखील उडी घेतली. अखेर राज्य सरकारनं त्रिभाषा सुत्राबाबत काढलेले दोन्ही जीआर रद्द केले. त्रिभाषा सुत्राचा अभ्यास करण्यासाठी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली.

दरम्यान त्रिभाषा सुत्राचा जीआर रद्द केल्यानंतर मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते, या मेळाव्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला. मात्र दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाहीये.

मात्र आजपासून इगतपुरी येथे मनसेचं शिबिर सुरू झालं आहे. या शिबिरामधून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही,  नोव्हेंबर – डिसेंबरदरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय घेऊ, असं राज ठाकरे यांनी इगतपुरीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांदरम्यान म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी आज इगतपुरीमध्ये युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. युतीबाबत शिवसेना ठाकरे गटानं टाळी दिलेली असताना दुसरीकडे मात्र मनसे सावध पवित्रा घेत असल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरेंच्या विधानानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स आता आणखी वाढला आहे.

राज ठाकरेंचा तीन दिवस इगतपुरीत मुक्काम  

मनसेनं नेते आणि पदाधिकाऱ्यांसाठी शिबिराचं आयोजन केलं आहे, या शिबिराला इगतपुरी येथे आजपासून सुरुवात झाली आहे. या शिबिराच्या माध्यमातून राज ठाकरे हे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. हे शिबिर तीन दिवसांचं असून तीनही दिवस राज ठाकरे यांचा मुक्काम इगतपुरी येथे असणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शिबिराला महत्त्व प्राप्त झालं आहे.