अशा बाईला पदावरून दूर करा, रुपाली चाकणकरांविरोधात महाविकास आघाडीच्या दोन महिला नेत्या एकवटल्या; मोठ्या घडामोडी घडणार?
हुंड्यामुळे झालेल्या वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. अशातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या विरोधकांच्या निशाण्यावर आल्या आहेत.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावरून राज्य महिला आयोग्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या दोन महिला नेत्या एकवटल्या आहेत. रोहिणी खडसे आणि किशोरी पेडणेकर यांनी थेट चाकणकरांना अध्यक्षपदावरून दूर करण्याची मागणी केली आहे. “रुपाली चाकणकर यांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महिलांना धमकावण्याचा ऑडिओ आहे. खरंतर रूपाली चाकणकरांचं पद आता जाणार आहे, त्यामुळे या वैफल्यग्रस्त भावनेतून त्या असे प्रकार करत आहेत. चाकणकर यांच्याविरोधात पोस्ट करणाऱ्यांना धमकवण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. रूपाली चाकणकर या वैफलग्रस्त झाल्या आहेत. महिला आयोगाच्याऐवजी आता धमकी आयोग असं नाव ठेवायला हवं,” असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
वैष्णवी प्रकरणावरून त्या पुढे म्हणाल्या, “वैष्णवी हगवणेंच्या समर्थनार्थ त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढलेला नाही. तर रूपाली चाकणकरांच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढला. चाकणकर स्वत:चं पद टिकवण्यासाठी असे आंदोलन करून घेत आहेत. पदाचा लोभ किती असावा हे या विषयावरून दिसतंय. महिला आयोगाची गुंडगिरी आणि दादागिरी सहन केली जाणार नाही. आधीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी खूप चांगलं काम केलं होतं. आताच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा या धमकी देणाऱ्या आहेत. रूपाली चाकणकर यांची हकालपट्टी होणारच आहे.”
किशोरी पेडणेकर यांनीसुद्धा चाकणकरांवर निशाणा साधला आहे. “महिला आयोगाच्या अध्यक्षा कितवी शिकलेल्या असाव्यात याचे काही निकष आहेत. परंतु कशा संस्कारी असाव्यात, संवेदनशील असाव्यात हे मात्र रूपाली चाकणकरांच्या अंगी अजिबात दिसत नाही. महाराष्ट्रात अनेक घटना घडत आहेत, महाराष्ट्रामध्ये इतका महिलांवर अन्याय होत आहे. पण तरीही पक्षाच्या विरोधात कोणी काही बोललं तर ही बाई पदर खचून उभ्या राहतात. वैष्णवी हगवणेंची आत्महत्या आहे की हत्या हे पोलीस बघतील. पण याच्यामध्ये रूपाली चाकणकर यांनी त्यांचे असंस्कार पक्के दाखवले आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
“लोकांना ती चिल्लर म्हणते. चिल्लर या बाई आहेत. आता हे लोक उघड उघड बोलायला लागले आहेत. अशा चिल्लर थिल्लर बाई अध्यक्ष म्हणून ठेवत असतील किंवा त्यांच्यावर कुठल्या संस्थेचा किंवा पक्षाचा दबाव नसेल तर महाराष्ट्र कुठे चालला आहे. त्यामुळे ज्या महाराष्ट्राच्या पीडित महिला, लाडक्या महिला आहेत त्या 100% या रुपालीचा माज उतरवतील. या पदाला न्याय देणाऱ्या अनेक महिला असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांची भावना आणि तळमळ समजून घेऊन हिचा विचार करावा आणि अशा बाईला पहिलं पदावरून काढून टाकावं. तिथे एक सक्षम महिला नियुक्त करावी”, अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली.
