वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाचा मोठा निर्णय, आता लग्नात…भविष्यात काय होणार?
वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर मराठा समाजाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक बैठक घेण्यात आली आहे.

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट सुन्न आहे. जमीन खरेदी करण्यासाठी तुझ्या घरच्यांकडून दोन कोटी रुपये घेऊन ये असा तगादा तिच्या सासरच्या मंडळींनी लावला होता. तसेच तिचा शारीरिक तसेच मानसिक छळ केला जात होता. असे असतानाच आता वैष्णवीचे हे प्रकरण समोर आल्यानंतर मराठा समाजाने समोर येऊन मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता हुंडाबळी तसेच खोट्या तामझामामुळे महिलांचे बळी जाणार नाहीत, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येचे प्रकरण समोर आल्यानंतर मराठा समुदायाने लग्नात होणारा वायफळ खर्च थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते, नेते यांनी एकत्र येत एक बैठक घेतली आहे. या बैठकीत वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आहेत.
नेमकं काय ठरवण्यात आलं?
या बैठकीला पुण्यातील मराठा समाजाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यात काँग्रेसचे नेते अरविंद शिंदे, अंकुश काकडे, आमदार चेतन तुपे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी नगरसेवक श्रीकांत शिरोळे, शरद पवार गटाचे प्रशांत जगताप, मराठा समाजाचे कार्यकर्ते राजेंद्र कोंधारे तसेच आदी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. लग्न समारंभात वायफळ खर्चावर आळा घालणे, सासू-सासरे यांनी सूनेला सन्मान द्यावा, आई-वडिलांनी मुलीच्या छळवणुकीविरोधात आवाज उठवावा असे ठराव मान्य करण्यात आले आहेत.
साधं लग्न करा, अन्यथा…
एखाद्या लग्नात मोठा तामझाम केला जात असेल तर मराठा समुदाय अशा लग्नांत सहभागी होणार नाही, असाही ठराव संमत करण्यात आला. वैष्णवीच्या आत्महत्येने आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. या घटनेनंतर आता साध्या पद्धतीने लग्न करण्यासाठी आम्ही लोकांना प्रोत्साहित करणार आहोत, त्यासाठी एक मंच उभा केला जाईल, अशी माहिती श्रीकांत शिरोळे यांनी दिली.
नेमकं प्रकरण काय?
वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी पिंपरी-चिंचवड येथील बावधन येथे आपल्या सासरी आत्महत्या केली होती. अजित पवार यांच्या पक्षातील निलंबित नेते राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबीयांनी तिचा छळ केला. तसेच तिच्या माहेरच्या मंडळींना 2 कोटी रुपये मागितले होते. विशेष म्हणजे वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर कार तसेच चांदीची भांडी अशा वस्तू देण्यात आल्या होत्या. या प्रकरणात वैष्णवीचा नवरा शशांक, तिचा दीर, राजेंद्र हगवणे, वैष्णवीची सून, तिची नणंद हे सगळेच तुरुंगात आहेत.
