नेमाडे साहित्य संमेलनाकडे फिरकतही नाहीत; अध्यक्षपद कसे मिळते याची सगळ्यांना कल्पना, पठारे यांचे खडेबोल

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणे हा राजकारणाचा भाग झाला आहे. संमेलनाचे अध्यक्षपद कसे मिळते याची सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळेच ज्ञानपीठप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे साहित्य संमेलनाकडे फिरकतही नाहीत, असे म्हणत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी खडेबोल सुनावले.

नेमाडे साहित्य संमेलनाकडे फिरकतही नाहीत; अध्यक्षपद कसे मिळते याची सगळ्यांना कल्पना, पठारे यांचे खडेबोल
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे आणि रंगनाथ पठारे.

नाशिकः साहित्य संमेलनाचा (Sahitya Sammelan) अध्यक्ष होणे हा राजकारणाचा भाग झाला आहे. संमेलनाचे अध्यक्षपद कसे मिळते याची सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळेच ज्ञानपीठप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) साहित्य संमेलनाकडे फिरकतही नाहीत, असे म्हणत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे ( Ranganath Pathare) यांनी खडेबोल सुनावले. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या अधिकारवाणीचे चार शब्द नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता सुनावल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या साहित्य संमेलनात फक्त एकामागून एक वाद आणि वादच सुरू आहेत. साहित्य संमेलनाचे निमंत्रक आणि आयोजन समित्यांमध्येही प्रचंड वादावादी सुरू आहे. संमेलनातील व्यासपीठावर राजकीय लोकांचा राबता राहणार आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर पठारे यांनी व्यक्त केलेले विचार नक्कीच आत्मपरीक्षण करायला लावणारे आहेत.

सकस साहित्यप्रसार नाही

रंगनाथ पठारे म्हणाले की, साहित्य संमेलनाचा हेतू बाजूला पडला आहे. सध्या संमेलन केवळ उत्सव साजरा करण्याची प्रथा झालेली आपल्याला दिसत आहे. मग ज्यांना उत्सव साजरा करायचा आहे, ते तिथे जातात. संमेलनातून सकस साहित्यप्रसार होत नाही. ज्ञानात भर घालेल अशी चर्चा नसते. त्यातून काहीच हाती लागत नाही. संमेलनाबाबत मला 10 वर्षांपासून फिलर्स आले, पण मला त्यात रस नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. संमेलनात साहित्य, समाज, संस्कृतीच्या कक्षा रुंदावण्यासारखे काहीच घडत नाही. त्यामुळे मी उत्सवात जात नाही. मात्र, आपला संमेलनाला विरोध वगैरे आहे असे नाही, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

राजकारणाचा भाग

पठारे म्हणाले की, साहित्य संमेलन देखील राजकारणाचा भाग झाले आहे. संमेलन साहित्यासाठी असते की कशासाठी हे घडणाऱ्या घटना आणि घडामोडींवरून लगेच लक्षात येते. संमेलनाध्यक्ष होणे हा राजकारणाचा भाग झाला आहे. त्यामुळे विचारणा होऊनही अनेक मान्यवर त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. मराठी साहित्यातील सध्याचा सर्वात मोठा आणि ज्ञानपीठप्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे संमेलनाकडे फिरकतही नाहीत. त्यावरूनच तुम्ही काय ते समजून घ्या, अशा झणझणीत शब्दांत पठारे यांनी आपली मते व्यक्त केली.

राजकारणी आले की असे होते?

पठारे म्हणाले की, राजकीय व्यक्ती साहित्य संमेलनात येतात. पंतप्रधान येऊ द्या किंवा मुख्यमंत्री येऊ द्या. यांची भाषणे होतात. ते व्यासपीठ सोडून बाहेर पडतात. तेव्हा संमेलनातील अर्धी गर्दी कमी होते. खरे तर संमेलनाध्यक्ष हे मानाचे पद आहे. त्यांच्या उपस्थितीत असे घडणे, चांगले आहे का. आपणास ते कितपत योग्य वाटते, असा सवालही त्यांनी यावेळी केला. संमेलनाचे अध्यक्षपद कसे मिळते याची सगळ्यांना कल्पना आहे. कोणताही लेखक आपल्या लेखनातून संवाद साधतो. त्याला उत्सवाची गरज कशाला, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

इतर बातम्याः

साहित्य संमेलनात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील 50 ग्रंथाचे प्रकाशन; 26 ग्रंथ मराठी, 14 ग्रंथ इंग्रजी आणि 10 ग्रंथ हिंदी भाषेत

दोन वर्षे राक्षसी सत्तेची, भाजपचे अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष भोसले यांची महाविकास आघाडीवर जहरी टीका

Published On - 11:50 am, Sun, 28 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI