विधान परिषद निवडणुकीत महायुतीत कुठल्या पक्षाच्या उमेदवारासोबत दगाफटका होऊ शकतो? महत्वाची माहिती समोर

Vidhan Parishad Election : सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधान परिषद निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. 17 पैकी 17 जागा महायुती जिंकेल अशी स्थिती आहे. पण महायुतीतच दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीत कुठल्या पक्षाच्या उमेदवारासोबत दगाफटका होऊ शकतो? महत्वाची माहिती समोर
Mahayuti
| Edited By: | Updated on: May 29, 2026 | 12:15 PM

सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची चर्चा आहे. विधान परिषदेच्या एकूण 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. आपसात समन्वय साधून निवडणूक लढवण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. पण कुठल्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार यावरुन मतभेद आहेत. पुणे, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांवरून महायुतीमधील पक्षांमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला 4 जागांची ऑफर देण्यात आली आहे, परंतु शिवसेना शिंदे गट 6 जागांच्या मागणीवर ठाम आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी जागा वाटप अजून जाहीर होऊ शकलेलं नाही. अलीकडे भाजपची अनेक स्वराज्य संस्थांमध्ये ताकद वाढली आहे. त्यांच्या उमेदवारांच्या विजयाची शक्यता अधिक आहे. त्यामुळे भाजप सहजासहजी कुठलीही जागा सोडणार नाही.

विधान परिषदेच्या निवडणुकांवरून महायुतीत मतमतांतर दिसून येत आहेत. जिल्हा परिषदेला भाजपकडून मिळालेल्या वागणुकीवरून शिवसेनेतील नेते, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. अनेक जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी घेतलेल्या बैठकांमध्ये आमदार नगरसेवक आणि पदधिकाऱ्यांनी ही नाराजी बोलून दाखवली. सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजी नगर आणि रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत जोरदार जुंपलेली पहायला मिळाली. साताऱ्यात तर मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद आबा पाटील यांना झालेल्या धक्काबुकीचे पडसाद विधानसभेत उमटले.

जखम अजूनही भरलेली नाही

जिल्हा परिषदेला घडलेल्या घटनांची जखम अजूनही भरलेली नसून याचे पडसाद विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये उमटू शकतात. शिवसेना नेत्यांकडून जिल्हापातळीवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्थानिक नेत्यांकडून भाजपबाबत नाराजी नोंदवली जात आहे, तसे संकेतही शिवसेना नेत्यांनी दिलेत. काही जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र किंवा भाजपसोडून इतर पक्षांसोबत युती करण्याबाबतची मतेही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्यांकडे मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोणाला बसणार फटका?

अनेकजिल्ह्यांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) किंवा इतर पक्षांसोबत युती झाल्यास भाजपला काही जागांवर विधान परिषदेला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर जरी विधान परिषदेची निवडणुक महायुती म्हणून लढण्याचा निर्णय होत असला तरी जिल्हा पातळीवरील नेत्यांमध्ये खदखद कायम आहे. भाजपचे अनेक पालकमंत्री मित्र पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन चालत नाहीत. अनेक निर्णयांमध्ये मित्र पक्षांना डावलून निर्णय घेतले जात असल्याची खंत सोलापूरातील शिवसेनेच्या कोअर कमिटीत बोलून दाखवण्यात आली.

शिवसेनेचे मंत्री लवकरच भेटणार

याबाबत शिवसेनेचे मंत्री लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महायुतीत समन्वय रहावा, याबाबत भाजप नेत्यांना सूचना कराव्यात यासाठी भेट घेणार असल्याचे कळते. तर दुसरीकडे शिवसेनेकडून आता जिल्ह्यातील आमदार, नगरसेवक यांच्या बैठकांचे सत्र सुरू करत नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

 

Follow Us