शिंदेंना युतीतून बाहेर पडावे लागेल, नव्या भाकिताने खळबळ, प्रचंड घडामोडी वाढल्या!
महायुतीत सध्या नाराजीनाट्य रंगले आहे. शिवसेनेचे सर्वच मंत्री नाराज आहेत. असे असतानाच आता माजी मंत्र्याने केलेल्या एका विधानाची सगळीकडेच चर्चा होत आहे. त्यामुळे नेमकं काय होणार? असं विचारलं जात आहे.

BJP Vs Shivsena : राज्यात महायुतीमध्ये मोठं नाराजीनाट्य रंगलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर थेट बहिष्कार टाकला आहे. या बैठकीला फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच उपस्थित होते. बैठकीनंतर शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात होत असलेल्या इन्कमिंगवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर शिंदे यांच्या पक्षाचे नेते तथा मंत्री उदय सामंत हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्यासाठी गेले होते. परंतु ही भेट होऊ शकली नाही. भाजपा तसेच शिवसेनेकडून आमच्यात कोणतीही नाराजी नाही, असे सांगण्यात आले आहे. परंतु सध्या मुंबईत घडत असलेल्या घडामोडी पाहता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेले आहे. असे असतानाच आता माजी मंत्र्याने शिवसेनेच्या महायुतीतून बाहेर पडण्याबाबत मोठं विधान केलं आहे.
शहाजीबापू पाटील काय म्हणाले?
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे स्थानिक पातळीवर अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी भाजपात जात आहेत. शिवसेनेच्याही अनेक स्थानिक नेत्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच शिंदेंचे आमदार, मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. हीच अस्वस्थता शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा सांगोला मतदारसंघाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी बोलून दाखवली आहे. एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा, अशा पद्धतीचं भाजपाचं वागणं दिसत आहे. महाराष्ट्रात असं राजकारण होणार असेल तर महाराष्ट्राची वैभवशाली राजकारणाची परंपरा थोड्याच दिवसात उद्ध्वस्त झाल्याचे तुम्हाला दिसेल, अशी खदखद शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केली. सांगोल्यात नगरपालिका निवडणुकीत घडत असलेल्या घडामोडी आणि पक्षांतर यावर बोलताना शहाजीबापू पाटील यांनी या भावना व्यक्त केल्या. याबाबत विचारले असता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेला दोनच पर्याय शिल्लक राहतील. एक तर त्यांना महायुतीतून बाहेर पडावे लागेल नाहीत तसेच मरून जावे लागेल, असे वडेट्टीवार म्हणाले.
वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले? काय टीका केली?
शिंदे गटाच्या आमदारांच्या वेदना, त्यांचे दु:ख हे मनातून आलेलं आहे. आता त्याची कळ ही किती भारी आहे, हे शिंदे सेनेला भविष्यात दिसेल. जेव्हा दु:खाची ही कळ असह्य होईल, तेव्हा त्याच्या उपचारासाठी त्यांना महायुतीतून बाहेर पडावे लागेल. त्यांना महायुतीतून बाहेर पडण्याचा उपचार करावा लागेल किंवा मरावे लागेल. हे दोनच पर्याय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
नाराजी नसल्याचा दावा
दरम्यान, आमच्यात कोणतीही नाराजी नाही. कोणतीही अडचण आली की आम्ही थेट मुख्यमंत्र्यांकडे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडेच जाणार, असे म्हणत सर्वकाही आलबेल असल्याचे शिंदे यांच्या पक्षाच्या मंत्र्याने सांगितले आहे. तर दुसरीकडे भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील महायुतीत कोणतीही नाराजी नाही, असे स्पष्ट केले आहे. असे असले तरी महायुतीत काहीतरी घडत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
