नाद करतो काय,नाद करती काय.. सकाळी 5 पातेली झाली, संध्याकाळी 4 होतील ! ‘7777 मटनाचा बेत’ हॉटेलची तूफान डायलॉगबाजी व्हायरल..
सोलापूर-पुणे महामार्गावरील माढ्यातील "7777 मटणाचा बेट" हे हॉटेल आपल्या अनोख्या जाहिराती आणि डायलॉगबाजीमुळे प्रचंड लोकप्रिय झाले आहे. मालक लखन माने यांच्या सोशल मीडिया मार्केटिंगने हॉटेलने वेगळी ओळख निर्माण केली आहे. उत्कृष्ट दर्जाचे मटण आणि भाकरी, तसेच प्रतिदिन हजारो थाळ्यांची विक्री हे या यशाचे प्रमुख घटक आहेत.

आजकाल जिथं बघावं तिथ नवनवी हॉटेल्स उघडलेली दिसतात. पिझ्झा, पास्ता, बर्गर तर कधी चिकन-मटण थाळीची चलती, सोशल मीडियावरही अशा हॉटेल्सची रील्स भरपूर फिरत असतात. ‘बोलणाऱ्याची मातीही विकली जाते, न बोलणाऱ्याचं सोनंही खपत नाही..; अशी एक म्हण आहे. मार्केटिंग हेच विक्रीचं गुपित आहे हे लक्षात घेऊनच आजकाल सगळीकडे तूफान जाहिराती केल्या जातात. पण त्यासाठी कंटेंट पण युनिकच लागतो. हेच लक्षात घेऊन सोलापूर पुणे महामार्गावरील माढ्याच्या टेंभुर्णीतील एका हॉटेलची जाहिरात आणि डॉयलॉगबाजीमुळे ते चांगलंच फेमस झालंय. त्याचे डायलॉगही खूप व्हायरल झालेत.
‘7777 मटनाचा बेत’ हॉटेल सुरू कसं झालं ?
नाद करतो काय…नाद करती काय..सकाळी 5 पातेले झालीत संध्याकाळी 4 होतील–असं म्हणत अख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या तिरंगा-भाग्यश्री-आणि 7777 या तिघा हॉटेल मालकांच्या व्यापाराविषयीचे जाहिरात कौशल्य आणि त्यांच्या डायलॉगची सध्या सगळीकडे क्रेझ झाली आहे. प्रचंड क्रेझ मध्ये असलेल्या सोलापूर पुणे महामार्गावरील माढ्याच्या टेभुर्णीतील हॉटेल 7777 आणी या हॉटेलचा मालकही चांगलाच व्हायरल झालाय.
लखन माने असं या हॉटेल मालकाचे नाव आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेला आणि रील बनवण्याची छंद जडलेल्या या युवकाच्या डोक्यात व्यापार जागा झाला. त्यानंतर त्याने सोलापूर पुणे महामार्गावर भाड्याने हॉटेलसाठी जागा घेतली, शेड उभी केली आणि “7777 मटनाचा बेत “या नावाने हॉटेल सुरु केलं. आणि पाहता पाहता अल्पावधीतच या हॉटेलने महाराष्ट्रातील मटन खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असून सर्वांनाचं भुरळ घातलीय.
डायलॉगबाजीची सगळीकडे क्रेझ
हे यश मिळण्याचं मुख्य कारण म्हणजे जेवणाची उत्तम क्वॉलिटी तर आहेच पण त्याशिवाय हॉटेल व्यवसायासाठी सोशल मिडीयाचा खुबीने केलेला वापर आणि डायलॉगबाजी. हे महत्वाचे फॅक्टर ठरले. हॉटेलच्या जागेला मालकांकडून 70 हजार रुपये प्रति महिना दिले जात आहेत. तर हॉटेल मॅनेजर- वेटर ते कामगार अशी जवळपास 40 ते 45 जणांची टीम तेथे आहे. त्यांनाही एक प्रकारे रोजगार मिळाला आहे. हॉटेलमध्ये 10 महिला भाकरीचे काम करतात. त्यांना दिवसाला अडीच क्विंटल ज्वारीचं पिठ लागतं. तर एका दिवसात किमान 15 तर जास्तीत जास्त 19 बोकडं लागतात. मटण थाळीचा दर 300 रुपये असून दिवसांकाठी तब्बल 1 हजार थाळी विकली जाते. एकदमच बोकडाचा स्टॉक आणला जातो अशी माहिती हॉटेल व्यवस्थांपकाकडून देण्यात आली.
मागच्या काही दिवसांपूर्वी हॉटल 7 /12 ची चलती होती. त्यानंतर चुलीवरचं मटनं आणि चुलीवरची भाकरी फेमस झालं होतं. मात्र मागच्या तीन महिन्यापासून तिरंगा-भाग्यश्री-आणि 7777 या तीन हॉटेलवाल्यांनी सोशल मिडियाच्या इन्स्टाग्रामवर खास डायलॉगबाजी करत नुसता धुरळा उडवत ” ढवारा मटन” ची संकल्पना ही हॉटेल व्यवसायात रुढ केली. आता हीच प्रथा गावखेड्यातील हॉटेलात देखील येऊ लागलीय. इन्स्टाचे फॅन तर हॉटेल मालकांसोबत आणि हॉटेलचे लोकेशन टाकण्यासाठी धडपड करतात.सोलापूरच नव्हे तर जिल्ह्यातून शेकडो किलमीटरचा टप्पा पार करुन हॉटेलमध्ये आवडीने येताना दिसत आहेत. तर असे मराठी व्यवासायिक तयार व्हायला हवेत, अशा प्रतिक्रिया मटन खवय्यांनी व्यक्त केल्या.
