वाल्मिक कराड जेलमध्ये व्हीसीद्वारे 2-2 तास लोकांशी गप्पा मारतो, अंजली दमानियांच्या दाव्यावर काय म्हणाल्या करूणा शर्मा ?
अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड यांना जेलमध्ये मिळणाऱ्या विशेष सुविधांवर आरोप केले आहेत. कराड व्हिडीओ कॉलद्वारे लोकांशी बोलतो, चांगले जेवण मिळवतो यासारख्या आरोपांना करूणा शर्मा यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी स्वतःच्या बीड जेलमधील अनुभवाचे उदाहरण देत दमानियांच्या आरोपांबद्दल सहमती दर्शवली.

वाल्मिक कराड जेलमधून व्हीसीद्वारे लोकांशी गप्पा मारतोय,2-2 तास तो लोकांशी बोलतो असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. कराडला तुरूंगात चहा-नाष्टाही दिला जातो असं म्हणत अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा कराडला दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल सवाल उपस्थित केला. त्यांच्या याच आरोपांवर आता करुणा शर्मा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया यांचे जे आरोप आहेत, त्यावर मी ठामपणे शिक्कामोर्तब करू शकते. मी स्वत: त्या बीड जेलमध्ये 16 दिवस राहिले आहे, त्यामुळे दमानिया यांचं म्हणणं नक्कीच खरं आहे, असं मी सांगू शकते, आपण त्यांच्याशी सहमत असल्याचं करूणा शर्मा यांनी सांगितलं.
काय म्हणाल्या करूणा शर्मा ?
मी 16 दिवस बीडच्या त्या तुरूंगात राहिले आहे, माझा नवरा माझ्यासोबत पण अर्धा-अर्धा तास बोलत होता. मी 6 दिवस अन्नही खाल्ल नव्हतं, फक्त एका सफरचंदावर मी होते. तेव्हा मला जेलमध्ये असतानाही चांगल्या हॉटेलचं खाणं पाठवण्यात आलं होतं. धनंजय मुंडेंनी मला फोन करू सांगितलं की हे फाईव्हस्टार हॉटेलचं चांगलं जेवणं पाठवलंय, तू खा हे. ते माझ्याशी अर्धा तास फोनवरही बोलायचे.त्यामुळे अंजली दमानियांनी वाल्मिक कराडला मिळणाऱ्या सोयींबद्दल जो दावा केला आहे, तो 100 टक्के बरोबर आहे.त्यांच्या आरोपांवर माझा विश्वास आहे, असं करूणा शर्मा म्हणाल्या.
धनंजय मुंडेंसारखे लोक मंत्रालयात नकोत
धनंजय मुंडेंसारखे लोक मंत्रालयात नकोत, असे म्हणत त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत पुनरुच्चार केला. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांची सावली आहे, ताच्याकडे हजारो कोटींची मालमत्ता आहे, असा दावा त्यांनी केला. त्यासाठीच आज राजीनाम्याची मागणी केली जात आहे, त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे,असे त्या म्हणाल्या. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं,
अंजली दमानियांचा दावा काय ?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मंत्री धनंजय देशमुख यांच्या जवळचा वाल्मिक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचा दावा सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात सातत्याने कराड आणि मंत्री मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर दोघांवर टीकेची झोड उठवली, त्यांनी कराडवर अनेक आरोपही केले. वाल्मिक कराड हाँ जेलमध्ये बसून व्हिडीओ कॉलद्वारे 2-2 तास लोकांशी बोलतो, असा आरोप दमानियांनी केला. दोनच दिवसांपूर्वी तिथल्या जेलच्या अधिकाऱ्यांनी पत्रं लिहीलं की आमचे सीसीटीव्ही चालतं नाहीत. याचाच अर्थ त्यांना कोणालाही काहीही उत्तर द्याची गरज नाही, असं त्याचं म्हणणं असल्याचा दावा दमानिया यांनी केला. कोणीही येईल आणि कोणीही वाल्मिक कराडला भेटेल. आता आम्हाला अशी माहिती मिळत आहे की कराडचा चहा, नाश्ता, जेवण हे सगळं ऐशोआरामात मिळत आहे, त्याची अगदी बडदास्त ठेवली जात आहे, असा आरोप दमानिया यांनी केला. एवढंच नाही तर व्हीसीद्वारे ते 2-2 तास लोकांशी गप्पा मारतात, वकिलांच्या नावाखाली कोणीही त्यांची भेट घेत आहे, असा आरोपही दमानियांनी केला असून या सुविधांबद्दल सवाल उपस्थित केला.
