weather update : महाराष्ट्रात पाऊस धो-धो कोसळणार, राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार? पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे चिंता वाढली होती. मात्र सप्टेंबर महिन्यात पावसाचं जोरदार पुनरागमन होणार आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख (Weather expert Punjabrao Dakh) यांचा नवा हवामान अंदाज समोर आला आहे.

राज्यात पावसाने चांगलीच दडी मारली आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पाऊसच झालेला नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. पाऊस झाला नसल्यामुळे याचा प्रचंड फटका हा खरीप हंगामाला बसला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील 72 तासांमध्ये राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. याबाबत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा नवा अंदाज समोर आला आहे.
काय आहे नवा अंदाज?
अनेक शेतकऱ्यांचे फोन आले आहेत की पाऊस कमी होणार आहे. परंतु तुम्हाला सांगतो, राज्यात काही ठिकाणी मधे मधे कडक ऊन पडणार आहे. मात्र राज्यात सात, आठ आणि नऊ सप्टेंबर हे तीन दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. या काळात विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसणार आहेत, असा अंदाज डख यांनी वर्तवला आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रातला पाऊस काय एकदम बंद पडणार नाही, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. दुसरीकडे परतीचा पाऊस मात्र महाराष्ट्रात जोरदार कोसळणार आहे. ज्या भागात पाऊसच झाला नाही, त्या भागांना परतीचा पाऊस जीवदान देणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी 13 सप्टेंबरपर्यंत आपली राहिलेली कामं करून घ्यावीत, कारण त्यानंतर राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात राज्यात पावसाचा जोर राहणार आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
20 राज्यांना हाय अलर्ट
दरम्यान पुढील 24 तासांमध्ये देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. 20 राज्यांना भारतीय हवामान विभागाकडून हाय अलर्ट देण्यात आला आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, झारखंड, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, गुजरात, आसाम आणि महाराष्ट्र या राज्यात जोरदार पावसाचा अंदजा वर्तवण्यात आला आहे.
