Radhakrishna Vikhe Patil : जरांगेंशी पुन्हा चर्चा करणार का? विखे पाटील यांनी दिलं एका वाक्यात उत्तर; नेमकं काय म्हणाले?
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर आणि मराठा आरक्षणावर मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, जरांगे पाटलांना भेटण्याची सध्या आवश्यकता नाही कारण त्यांच्या मागण्यांवर कार्यवाही सुरू आहे. विखे पाटील यांनी कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणार नाही हे स्पष्ट केले.

गेल्या दहा दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. जरांगे पाटील यांनी पाणी सोडलं आहे. उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचं मोठं विधान आलं आहे. मनोज जरांगेंना भेटण्याची आवश्यकता नाही. भेटीबाबत काही ठरलेलं नाही. त्यांच्या मागण्यांवर कार्यवाही सुरू आहे, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही भेटायला जाणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर, विखे पाटील यांनी थेट उत्तर दिलं. सध्या प्रश्नच नाही. भेटीबाबत काही ठरलेलं नाही. आम्ही भूमिका मांडली आहे. त्यांच्या मागण्यांवर आमची कार्यवाही सुरू आहे. त्यांची इच्छा असेल, त्यांच्या काही सूचना असतील आणि त्यांना सकारात्मक भूमिक घ्यायची असेल तर त्यांना भेटायला आम्ही केव्हाही तयार आहोत, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
आरक्षणाला धक्का लावणार नाही
सरकार एक पाऊल पुढे टाकण्यात आलं आहे. आतापर्यंत अनेक गोष्टी करत आहतो. आवश्यक समतोल साधून आम्ही पुढे जात आहोत. नियमाच्या बाहेर जाऊन काही करतोय असं अन्य समाजाला वाटू नये. सरकार नियमाला सोडून काही करत नाही. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का द्यायचा नाही. कोणत्याही आरक्षणात आरक्षण द्यायचं नाही, असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.
ग्रामपंचायत स्तरावर नोंदी लावणार
ज्या ज्या गावात नोंदी सापडल्या आहेत, त्या दोन तीन दिवसात ग्रामपंचायतीच्या स्तरावर लावण्यात येणार आहे. 10 ते 17 सप्टेंबरमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यामुळे गावातील लोकांना आपल्या नोंदी सापडल्या की नाही याची माहिती मिळणं सोपं जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आरक्षणाचा मुद्दा संपला
सध्या आरक्षणाचा मुद्दा संपलेला आहे. 50-51 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू शकत नाहुी. 10 टक्के एसीबीसीचं आरक्षण दिलं आहे. त्यामुळे आता कोणताही आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित नाहीये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
