Halal Township : ‘हा तर लँड जिहादच’; मुंबईजवळील हलाल टाऊनशिपच्या प्रोजेक्टवरून मोठा वाद
Halal Township : मुंबईजवळील नेरळमध्ये सुरू होणाऱ्या या टाऊनशिपवरून नवा वाद निर्माण झाला आहे. हे लँड जिहादचं उघडं रुप असल्याची टीका राजकीय नेत्यांकडून केली जात आहे. या टाऊनशिपची जाहिरात सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

मुंबईपासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्जतजवळील नेरळ इथल्या एका रिअल इस्टेट प्रोजेक्टची जाहिरात व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘हलाल लाइफस्टाइल टाऊनशिप’चा हा प्रमोशनल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हा प्रोजेक्ट एका विशिष्ट समुदायासाठी निवासी वसाहत म्हणून बनवला जात असल्याचा आरोप आहे. या प्रोजेक्टच्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये हिजाब घातलेली एक महिला हलाल टाऊनशिपचं वर्णन करताना दिसतेय. ‘सोसायटी में सबकुछ हलाल होगा’, ‘बच्चे जालीदार टोपियां लगाएंगे’, ‘महिलाएं बुर्का पहनेंगी’ असे जाहिरातीत वर्णन करण्यात आलं आहे.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या (NCPCR) अध्यक्षा प्रियांका कानूंगो यांनी सोशल मीडियावर ही जाहिरात शेअर करत टीका केली आहे. ‘ही जाहिरात नाही तर विष पसरवण्याचा प्रयत्न आहे. मुंबईजवळील कर्जतमध्ये फक्त मुस्लिमांसाठी हलाल लाइफस्टाइल टाऊनशिप बांधली जात आहे. हे राष्ट्राच्या आत राष्ट्र आहे. याबद्दल महाराष्ट्र सरकारला सूचित केलं जातंय’, असं त्यांनी लिहिलंय. शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते कृष्णा हेगडे यांनीही हलाल टाऊनशिपवर आक्षेप घेतला आहे. या जाहिरातीमागील हेतूवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी हा व्हिडीओ मागे घेण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारकडे या प्रोजेक्टची चौकशी करण्याची विनंती केली आहे.
View this post on Instagram
भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी थेट हा ‘गजवा-ए-हिंद’चा प्रयत्न असल्याची टीका केली आहे. असा प्रोजेक्ट्सना मुंबई किंवा महाराष्ट्रात कोणतंही स्थान नाही, असं त्यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे त्यांनी प्रोजेक्टच्या विकासकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. धार्मिक आधारावर या टाऊनशिपचं प्रमोशन केलं जात असल्याच्या तक्रारींवरून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) या प्रकरणाची दखल घेत राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे.
भाजपची टीका
“एक पाकिस्तान आपण भोगत आहोत. आता फाळणीची बीजे पुन्हा रोवू देऊ नका. धर्माच्या आधारावर मुंबईच्या आसपास उभे राहणाऱ्या ‘हलाल लाइफस्टाइल टाउनशिप’ निर्माण करून समाजात धार्मिक भेदाच्या भिंती बांधू पाहणाऱ्यावर कारवाई व्हायलाच हवी. सर सय्यद अहमद खानने 1857 च्या स्वांतत्र समरानंतर प्रथम मुस्लिमांसाठी स्वतंत्र राखीव जागा वेगळे सैन्य मागितलं होतं. हीच फाळणीची पहिली मागणी होती. आताही रायगडच्या कर्जत इथं उभा राहणारा ‘हलाल लाइफस्टाइल टाऊनशीप’ हा प्रकार देशाच्या अखंडतेसाठी ‘धोक्याची घंटा’ म्हणावी लागेल. वसाहतींचा हा प्रकार भारताच्या घटनात्मक मूल्यांवर थेट घाव घालणारा आणि समाजात जाणूनबुजून विभाजन आणि भेदभाव पसरविणारा आहे. धर्माच्या आधारावर स्वतंत्र टाऊनशीप उभारणे म्हणजे लँड जिहादाचं उघडं रूप! आज अशा टाऊनशीपना मुभा दिली, तर उद्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात वेगवेगळ्या धर्मासाठी स्वतंत्र वसाहती उभ्या राहतील. हे भारताच्या सामाजिक ऐक्याला, एकात्मतेला आणि सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणारं आहे”, अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.
