बाळासाहेब विखे विरुद्ध शरद पवार यांच्यातला वाद नेमका काय आहे?

बाळासाहेब विखे विरुद्ध शरद पवार यांच्यातला वाद नेमका काय आहे?

मुंबई : आघाडीत बिघाडी झाली तरी चालेल, पण नगर दक्षिणची जागा काँग्रेससाठी सोडणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याचं चित्र आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंना ही जागा हवी आहे. पण आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येते. पण नगरमध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी ही जागा सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं.

मातब्बर राजकारणी म्हणून शरद पवारांची ओळख आहे. कोणतीही गोष्ट ते कधीच विसरत नाहीत. असाच एक जवळपास 30 वर्षांपूर्वीचा राग कदाचित अजूनही त्यांच्या मनात आहेत. यानिमित्ताने शरद पवार त्या रागाचा बदला घेत असल्याची नगरच्या राजकारणात चर्चा आहे. हा वाद आहे शरद पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्यातला. हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता.

काय आहे विखे वि. पवार वाद?

शरद पवार आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यात अनेक वर्षांपासून संघर्ष चालत आला होता आणि त्यांच्यात दोन गट होते. पण 1991 च्या लोकसभा निवडणुकीत हा वाद खऱ्या अर्थाने पेटला. या निवडणुकीत नगर दक्षिणची जागा बाळासाहेब विखेंना टाळून काँग्रेसने यशवंतराव गडाख यांना दिली होती. अर्थात शरद पवारांनीच ही जागा गडाखांना मिळावी यासाठी जोर लावल्याचं बोललं जातं. बाळासाहेब विखे पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढले. या निवडणुकीत बाळासाहेब विखेंचा पराभव झाला. पण स्वतःच्याच जिल्ह्यात झालेला हा पराभव बाळासाहेब विखेंच्या जिव्हारी लागला होता.

बाळासाहेब विखेंनी आचारसंहितेचा धागा पकडत विजयी उमेदवार यशवंतराव गडाख यांच्याविरोधात तक्रार केली. या निवडणुकीत जात आणि धर्माच्या आधारावर मतं मागितली गेल्याचा त्यांनी आरोप केला. बाळासाहेब विखेंनी या प्रकरणी पुरावे जमा केले, प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि आरोपी होते यशवंतराव गडाख, तर सहआरोपी म्हणून शरद पवारांचं नाव होतं. शरद पवार या प्रकरणातून यशस्वीरित्या बाहेरही पडले होते.

पुढच्या पिढीतही वाद चालूच

बाळासाहेब विखे आणि शरद पवार यांच्यातला वाद उभ्या महाराष्ट्राला परिचित असला तरी हा वाद मात्र दुसऱ्या पिढीतही सुरु आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातही फार सौख्य नाही. सुजयला नातू समजून पवारांनी जागा सोडावी, असं विखे पाटील म्हणाले होते. पण ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

पुन्हा एकदा 1991 सारखी लढत?

नगर दक्षिणेत राष्ट्रवादीकडून प्रशांत गडाख यांच्या नावाची चर्चा आहे. शरद पवारांनी गडाख अस्त्र बाहेर काढल्याची चर्चा आहे. जर प्रशांत गडाख यांना उमेदवारी मिळाली, तर विखे विरुद्ध गडाख लढाईची पुनरावृत्ती पाहायला मिळू शकते. कारण यशवंतराव गडाखांनी स्वर्गीय बाळासाहेब विखेंचा पराभव केला होता. 1991- च्या लोकसभा निवडणुकीत विखे गडाख खटला देशभरात गाजला होता.  हा वाद प्रत्येक राजकारणात पाहायला मिळाला. त्यानंतर शरद पवार आणि विखे पाटील घराण्यात हा वाद आला. जर सुजय विखेंनी इथे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आणि राष्ट्रवादीने प्रशांत गडाख यांना उमेदवारी दिली तर हा वाद आणखी ताणणार यात शंका नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *