केडीएमसीमधील शिवसेना ठाकरे गटाचे नॉट रिचेबल नगरसेवक 28 दिवस नेमके कुठे होते? सर्वात मोठी बातमी समोर

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमधील शिवसेना ठाकरे गटाचे चार नगरसेवक गेल्या 28 दिवसांपासून नॉट रिचेबल होते. अखेर ते आता समोर आले आहेत.

केडीएमसीमधील शिवसेना ठाकरे गटाचे नॉट रिचेबल नगरसेवक 28 दिवस नेमके कुठे होते? सर्वात मोठी बातमी समोर
uddhav thackeray
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 13, 2026 | 9:36 PM

महापालिका निवडणुकीचे निकाल लागले, महापालिका निवडणुकीमध्ये भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला, तर राज्यात शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमाकांवर आहे. मात्र दुसरीकडे मुंबई आणि आणखी एक दोन महापालिका वगळता शिवसेना ठाकरे गटाला या निवडणुकीत अपेक्षित कामगीरी करता आली नाही. भाजप जरी राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी अनेक महापालिका अशा होत्या जिथे भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर होता, त्यामुळे या महापालिकांमध्ये आपला महापौर बसवण्यासाठी भाजपला मित्र पक्षांची गरज लागली. चंद्रपूर महापालिकेत तर शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनीच भाजपला पाठिंबा दिला, त्यामुळे चंद्रपूरमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय झाला, काँग्रेस बहुमताच्या जवळ जात असताना देखील त्यांना सत्तेपासून दूर रहावे लागले. दरम्यान आता ज्यांनी चंद्रपूरमध्ये भाजपला पाठिंबा दिला, त्या नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटानं स्पष्ट केलं आहे.

एकीकडे हे सर्व सुरू असतानाच कल्याण डोंबिवली महापालिकेत देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. या महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाचे चार नगरसेवक ऐनवेळी नॉट रिचेबल झाल्यानं केवळ आठ नगरसेवकांचाच गट बनवण्याची वेळ शिवसेना ठाकरे गटावर आली होती. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे हे सर्व नगरसेवक पुन्हा परतले आहेत.  तब्बल 28 दिवसांनंतर ठाकरे गटाचे चार ‘नॉट रिचेबल’ नगरसेवक आज कोकण भवनात दाखल झाले आहेत.

चार नगरसेवकांपैकी एकाने शिवसेना ठाकरे गटात अधिकृत प्रवेश केला आहे, तर तिघांनी स्वतंत्र नोंदणी केली आहे. नॉट रिचेबल असलेल्या नगरसेवकांपैकी किर्ती ढोणे यांनी शिवसेना ठाकरे गटात अधिकृत प्रवेश केला आहे. देवदर्शनासाठी गेले होते, वरिष्ठांच्या संपर्कात होते,  इतर तिघांविषयी माहिती नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसेना ठाकरे गटात सहभागी झालेल्या किर्ती ढोणे यांनी दिली आहे. दरम्यान दुसरीकडे  ‘आमचा आठ जणांचा गट आहे, तीन नगरसेवक अजून संपर्कात नाहीत; शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू असून कठोर कारवाई करू’ असा इशारा  ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी दिला आहे.