विधानसभेवेळी शरद पवारांकडे आलेले ते दोन लोक कोण? भाजपच्या बड्या नेत्यानं थेट सांगितलं

शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे, त्यानंतर आता शरद पवार यांच्या या आरोपांना भाजप नेत्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

विधानसभेवेळी शरद पवारांकडे आलेले ते दोन लोक कोण? भाजपच्या बड्या नेत्यानं थेट सांगितलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 09, 2025 | 3:54 PM

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे सातत्यानं निवडणूक आयोगावर आरोप सुरू आहेत, राहुल गांधींकडून आरोप सुरू असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील विधानसभा निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे.

‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी 2 माणसं मला भेटायला आली होती. ही 2 माणसं मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते. 160 जागांवर ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते’, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान शरद पवार यांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले दानवे? 

विधानसभा निवडणुकीला आता जवळपास सहा महिने पूर्ण होऊन गेले. या निवडणुकीचा जो निकाल लागला तो अजूनही महाविकास आघाडीच्या पचनी पडत नाही. पहिला आरोप ईव्हीएमवर केला, दुसरा आरोप मतदार यादीवर, तिसरा आरोप केला की शेवटच्या टप्प्यात मतदार कसे वाढले. असे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जात आहेत.

आजचा हा जो चौथा आरोप आहे, शरद पवार हे एक ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ नेत्याबद्दल आम्ही कधी बोलत नाही परंतु, मला असं वाटतं की हे जे दोन अधिकारी होते, त्या सर्वांच्या घरात कॅमेरे आहेत, एकदा जनतेसमोर ते दोन अधिकारी कोण आहे ते त्यांनी आणून दाखवावेत, असं थेट आव्हानच दावने यांनी शरद पवार यांना दिलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की रोज काही ना काही तरी आरोप करतात, विधानसभेचा निकाल त्यांच्या पचनी पडत नाहीये, आज संपूर्ण जनतेचे लक्ष  महाराष्ट्राच्या विकासाकडे आहे. आणि ते लक्ष विचलित करण्यासाठी हे आरोप करत आहेत.

निवडणूक काळामध्ये अनेक सर्वे एजन्सी येत असतात, तुम्ही आम्हाला सर्वे द्या, आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देतो. आमच्याकडे ते आले होते,  वैयक्तिकरित्या ते उमेदवाराकडे सुद्धा जातात की मी तुम्हाला जिंकून देतो म्हणून. त्यामुळे शंभर टक्के हे सर्वे करणारे लोक असू शकतात असंही यावेळी रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

आमच्याकडे लोकसभेला सुद्धा आले आणि विधानसभेला सुद्धा ते आले होते. एजन्सीला हे जर अधिकारी म्हणत असतील आणि त्याच्या आडून जर सरकारवर निशाणा साधत असतील तर,  त्यांनी खुलासा करावा की ते दोन अधिकारी कोण आहेत, असं आव्हान रावसाहेब दानवे यांनी यावेळी शरद पवार यांना केलं आहे.

शरद पवारांनी जो काही आरोप केला तो बिनबुडाचा आहे. तथ्यहीन आहे, या राज्यातील जनतेचा अपमान करणारे हे आरोप आहेत,  त्यांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. हे सगळे अधिकारी नसून सर्वे एजन्सी वाले लोक आहेत, असे प्रत्युत्तर रावसाहेब दानवे यांनी शरद पवारांना यावेळी दिलं आहे.