Maratha Reservation: जरांगे पाटलांच्या आंदोलनाला वाढीव परवानगी मिळणार का? CM फडणवीसांनी काय म्हटलं?

मनोज जरांगे पाटील मुबईत दाखल झाले असून त्यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. मात्र जरांगे पाटलांच्या आंदोलनाला केवळ एक दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे. आता त्यांनी वाढीव परवानगी मागितली आहे.

Maratha Reservation: जरांगे पाटलांच्या आंदोलनाला वाढीव परवानगी मिळणार का? CM फडणवीसांनी काय म्हटलं?
CM And Fadnavis
| Updated on: Aug 29, 2025 | 5:12 PM

मनोज जरांगे पाटील मुबईत दाखल झाले असून त्यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे अशी जरांगे पाटलांची मागणी आहे. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे. मात्र जरांगे पाटलांच्या आंदोलनाला केवळ एक दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या आंदोलनाला वाढीव परवानगी मिळणार का? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे.

जरांगे पाटलांनी आंदोलनाला वाढीव परवानगी मागितली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेली त्यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या मुदतवाढीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जरांगे पाटलांनी आंदोलनासाठी पुन्हा परवानगी मागितलेली आहे. उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत, त्या कायद्याच्या चौकटीत राहून पोलिस या परवानगीचा सकारात्मक विचार करतील.

तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, या आंदोलनाद्वारे जरांगे पाटलांनी ज्या मागण्या मांडल्या आहेत त्यावर तोडगा काढण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. आम्ही यासाठी एक उपसमिती तयार केली आहे. मराठा समाजाच्या मागण्यावर समितीचा विचार सुरु आहे. यावर कायदेशीर मार्ग काढावा लागणार आहे. फक्त आश्वासन देऊन चालणार नाही. संविधानात बसणारे मार्ग कसे काढता येतील असा सरकारचा प्रयत्न आहे. मी, एकनाथ शिंदे, अजित पवार समितीच्या संपर्कात आहोत असं म्हटलं आहे.

काहींचा दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

पुढे बोलताना फडणवीसांनी सांगितले की, ‘या आंदोलनामुळे दोन समाज एकमेकांसमोर उभे राहतील अशी परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहु नये असा आमचा प्रयत्न आहे. यासाठी ओबीसी समाजालाही सांभाळावे लागेल आणि मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल. गेल्या दहा वर्षांमधील आमच्या कार्यकाळात आम्ही मराठा समाजाला न्याय दिला आहे. आरक्षण देण्याचं काम आम्ही केलं आहे. आम्ही इतरही अनेक निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे आम्ही मराठा समाजाबद्दल सकारात्मक आहोत. या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत. मात्र काही लोक दोन समाज एकमेकांसमोर कसे येतील? ओबीसी आणि मराठा समाजात वाद लावण्याचे प्रयत्न माझ्या लक्षात येत आहेत. त्यांना माझं सांगणं आहे की आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करु नका, अन्यथा तुमचं तोंड भाजेल.’