मतदान करण्यासाठी आली अन् धाडकन कोसळली, धाराशिवमधील मतदान केंद्रात नको तेच घडलं, वाचा…
Tuljapur Local Body Election : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. तुळजापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील बुथवर घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

श्रीराम क्षीरसागर (प्रतिनिधी) : राज्यातील 262 नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. राज्यातील बहुतांशी ठिकाणी मतदान शांततेत पार पडत आहे. नागरिकांचा मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. तुळजापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील बुथवर घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. येथे नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
तुळजापूरमध्ये महिलेला आली चक्कर
तुळजापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील एका बुथवर घडली घटना मतदान करण्यासाठी आलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने या महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. राजश्री सदाशिव भोसले ही मतदान करण्यासाठी आली असता तिला चक्कर आली, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हृदयविकाराचा झटक्याने महिलेचा मृत्यू
राजश्री सदाशिव भोसले या महिलेला चक्कर आल्यानंतर बूथ वरील कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी या महिलेला मृत घोषित केले. या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता परिस्थिती पूर्ववत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
21 डिसेंबरला निकाल जाहीर होणार
आज सुरू असणाऱ्या मतदानाचा निकाल उद्या म्हणजेच 3 डिसेंबरला जाहीर होणार होता. मात्र आता हा निकाल लांबणीवर पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नगरपालिका आणि नगरपरिषदेचे सर्व निकाल 21 डिसेंबरपर्यंत जाहीर करु नका, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता उमेदवारांसह सर्वसामान्यांना निकालासाठी 21 डिसेंबर पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.
आजचे आणि 20 डिसेंबरचे मतदान नियोजित वेळेनुसारच होईल, परंतु निकाल मात्र 21 डिसेंबरलाच जाहीर केले जातील. निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 20 डिसेंबरला मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाने एक्झिट पोल जाहीर करता येतील, तर आचारसंहिता 20 डिसेंबरपर्यंत लागू राहील असं नागपूर खंडपीठाने म्हटले आहे.
