भविष्याचं गोड स्वप्न रंगवत फेअरवेल कार्यक्रमात बोलत होती, स्टेजवरच तरुणीला मृत्यूनं गाठलं
महाविद्यालयाच्या फेअरवेल कार्यक्रमात बोलत असतानाच एका वीस वर्षीय विद्यार्थिनीची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर ती स्टेजवरच कोसळली, या घटनेत तिचा मृत्यू झाला आहे.

धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. महाविद्यालयाच्या फेअरवेल कार्यक्रमात बोलत असतानाच एका वीस वर्षीय विद्यार्थिनीची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर ती स्टेजवरच कोसळली, या घटनेत तिचा मृत्यू झाला आहे. वर्षा खरात असं या मुलीचं नावं आहे. ही घटना परंडा येथील एका महाविद्यालयात घडली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, परंडा येथील एका कॉलेजमध्ये फेअरवेलचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमामध्ये बोलण्यासाठी वर्षा खरात स्टेजवर गेली. तिचं भाषण सुरू होतं. मात्र त्याचदरम्यान अचानक तिची तब्येत बिघडली. ती स्टेजवरच कोसळली ती बेशुद्ध झाली. या घटनेनंतर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच मोठा धक्का बसला. सर्वांनी स्टेजकडे धाव घेतली. तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र ती शुद्धीवर येत नसल्यानं तिला तातडीनं परंडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. समोर आलेल्या माहितीनुसार वर्षा आठ वर्षांची असतानाच तिच्या हृदयाचं ऑपरेशन झालं होतं. मात्र त्यानंतर बारा वर्ष तिला कोणताही प्रॉब्लेम आला नव्हता. तिची तब्येत सामान्य होती. प्रकृतीबाबत कोणतीही तक्रार नव्हती. तिला कोणत्याही प्रकारचे औषधोपचार देखील सुरू नव्हते. परंतु अचानक भाषण सुरू असताना तिची तब्येत बिघडली, ती स्टेजवर कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा वर्षा भाषण करत होती, तेव्हाच तिचा हृदविकाराचा झटका आला, त्यातच तिचा मृत्यू झाला. दरम्यान वर्षाच्या मृत्यूवर कॉलेज प्रशासनाकडून दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. तसेच महाविद्यालयाला एक दिवसांची सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. वर्षा ही आमच्या महाविद्यालयातील एक अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. ती महाविद्यालयाच्या प्रत्येक उपक्रमात सहभाग घ्यायची असं महाविद्यालयाच्या वतीनं यावेळी सांगण्यात आलं. वर्षाच्या निधनामुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वर्षाचा असा अचानक झालेला मृत्यू सर्वांसाठीच धक्कादायक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
