मनसेच्या मोर्चात राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार!

मोर्चात राज ठाकरे यांच्याबरोबरच पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे, कन्या उर्वशी ठाकरे आणि सूनबाई मिताली ठाकरे सामील होणार आहेत

MNS Morcha Raj Thackeray Family, मनसेच्या मोर्चात राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार!

मुंबई : मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेने पुकारलेल्या मोर्चात पक्षाध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब सहभागी (MNS Morcha Raj Thackeray Family) होणार आहेत. मनसेच्या महाअधिवेशनानंतर मोर्चातही राज ठाकरे यांचा संपूर्ण परिवार सहभागी होताना दिसणार आहे.

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मनसेच्या महाअधिवेशनातून राजकारणात एन्ट्री घेतली आहे. मनसेच्या नेतेपदाची जबाबदारी मिळालेले अमित ठाकरे मोर्चाच्या आयोजनातही हिरीरीने पुढे दिसत होते. मनसेचा मोर्चा ही अमित ठाकरेंसाठी चांगली संधी असल्याने त्यांचा सहभाग साहजिकच होता.

मोर्चात राज ठाकरे यांच्याबरोबरच पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे, कन्या उर्वशी ठाकरे आणि सूनबाई मिताली ठाकरे सामील होणार आहेत. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ठाकरे कुटुंब रवाना होण्याची चिन्हं आहेत. मात्र मनसेच्या महाअधिवेशनावेळी दिसलेल्या राज यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे मोर्चात सहभागी होण्याची शक्यता नाही.

मनसेने पुकारलेल्या मोर्चात भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यांचे कार्यकर्ते सहभागी होतील, असा दावा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे.

हेही वाचा : मनसेच्या मोर्चासाठी भाजप आमदाराच्या गाड्या

‘बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना या देशातून ‘चले जाव’ असा इशारा देणारा राज ठाकरेंचा मोर्चा आहे. या मोर्चात भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यांचे कार्यकर्ते, देशप्रेमी जनता सहभागी होईल. त्यामुळे वेगळं कोण कोण सहभागी होईल, असं सांगणं चुकीचे ठरेल’ अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना (MNS Morcha Raj Thackeray Family) व्यक्त केली.

 

मोर्चाचा मार्ग कोणता?

राज ठाकरे यांच्या नेतृत्वात दुपारी बारा वाजता हिंदू जिमखान्यापासून मनसेच्या मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर आझाद मैदानावर पोहचल्यानंतर राज ठाकरे संध्याकाळी सभेला संबोधित करतील. राज्यभरातील मनसैनिक मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करणारे बॅनर मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. अगदी ‘मातोश्री’समोरही मनसेने पोस्टरबाजी केली होती. सोशल मीडियातूनही मनसेने मोर्चासाठी चांगलीच ‘मोर्चेबांधणी’ केली आहे.

मोर्चासाठी दोन ते तीन लाख जण येण्याची शक्यता मनसे पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. यासाठी मुंबईतील आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. भव्य स्टेज उभारण्यात आला असून दोन लाख जणांसाठी आसनव्यवस्थाही करण्यात आली आहे.

आझाद मैदानात उभारलेल्या भव्य स्टेजवर आधी मनसे नेत्यांची भाषणं होतील. अखेरीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण होईल. हा मोर्चा का काढण्यात आला आहे, याचा उद्देश काय, हे राज ठाकरे आपल्या भाषणातून जाहीर करतील. यानंतर मोर्चाची सांगता होईल.

MNS Morcha Raj Thackeray Family

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *