Sanjay Raut: मोदी देवाचे अवतार असल्याचं सांगतात, पण त्याला…; संजय राऊत नेमकं काय म्हणाले? नव्या पुस्तकाचीही घोषणा
Sanjay Raut Reveals Details of His Upcoming Book: राजकारणातही काही अतृप्त आत्मे आहेत, ते गेले तरी फिरताना दिसतील, असं संजय राऊतांनी विधान केलं आहे. तसेच नव्या पुस्तकाची घोषणा केली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत लवकरच एका वेगळ्या विषयावर पुस्तक घेऊन येणार आहेत. ‘भूतभजन’ असं या पुस्तकाचं नाव आहे. भूत-प्रेत, अतृप्त आत्मे आणि त्यासंदर्भातील जगभरातील मान्यवरांचे अनुभव यांचा या पुस्तकात समावेश असणार आहे. या विषयाचा संदर्भ देताना संजय राऊत यांनी देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावरही मिश्किल टिप्पणी केली आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातही काही अतृप्त आत्मे आहेत. हे लोक गेले तरी असेच फिरताना दिसतील, असं ते म्हणाले.
संजय राऊत यांनी आपल्या लेखनप्रवासाबद्दल बोलताना सांगितलं की, त्यांचं संपूर्ण आयुष्य संघर्षात गेलं आहे. मात्र हा संघर्ष आनंदाने केला. त्यांच्या लेखनाची सुरुवात अशाच वेगळ्या विषयांवरील लिखाणातून झाली. आता ‘भूतभजन’ या पुस्तकाच्या माध्यमातून ते भूत-प्रेतांच्या विषयाला मनोरंजक स्वरूपात वाचकांसमोर आणणार आहेत. जगातील अनेक मान्यवरांनी भूतांबाबत घेतलेले अनुभव, त्यांच्याशी संबंधित किस्से आणि या विषयावरील साहित्याचा पुस्तकात समावेश असेल. अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूनंतर त्यांचं भूत फिरत असल्याच्या कथांचाही उल्लेख त्यांनी केला.
ते म्हणाले की, या विषयावर फारसं कोणी लिहित नाही. मात्र भूत-प्रेत आणि देव या संकल्पना समाजात अस्तित्वात आहेत. जगातील अनेक लोक शंभर टक्के देव मानतात आणि त्याच वेळी त्यांचं अस्तित्व नाकारतात. जे आहे, त्याचा अभ्यास करून ते पुढे आणलं पाहिजे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रावर आपला विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवाचा अवतार म्हटलं जातं; मात्र त्याला वैज्ञानिक आधार नाही. अशा विषयांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास होण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.
संजय राऊतांच्या आगामी पुस्तकात मोदी यांच्याशी संबंधित एका प्रकरणाचाही समावेश असणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील आठवणींबद्दल बोलताना संजय राऊत भावूक झाले. माझ्या आयुष्यात बाळासाहेबांचा आशीर्वादच खरा आहे. ते आजही माझ्या आजूबाजूला असल्यासारखं वाटतं. त्यांनी माझा हात धरून मला पुढे आणलं. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. ते माझ्यावर चिडायचेही. पण त्या रागामागे प्रेम होतं, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
बाळासाहेबांवर स्वतंत्र पुस्तक लिहिण्याची इच्छा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. माझ्या पत्नीची आणि मुलीचीही तशी इच्छा आहे. मी जे सत्य आहे तेच लिहितो. मी पाहिलेले आणि अनुभवलेले बाळासाहेब इतरांपेक्षा फार वेगळे होते. त्यांनी स्वतःला कधी देव मानलं नाही, तर एक माणूस म्हणूनच जगले, असं राऊत म्हणाले. त्यामुळे भूतभजनसोबतच बाळासाहेबांवरील त्यांच्या आगामी पुस्तकाचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.
