सलग सात तासांची बैठक निष्फळ, 'बेस्ट'चा संपच सुरुच राहणार

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरुच आहे. आज महापौर बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुंबईचे महापालिका आयुक्त, बेस्टचे व्यवस्थापक आणि कामगार नेते शशांक राव यांच्यात सलग सात तास चाललेल्या  बैठकीतही कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे उद्याही मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर …

सलग सात तासांची बैठक निष्फळ, 'बेस्ट'चा संपच सुरुच राहणार

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरुच आहे. आज महापौर बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुंबईचे महापालिका आयुक्त, बेस्टचे व्यवस्थापक आणि कामगार नेते शशांक राव यांच्यात सलग सात तास चाललेल्या  बैठकीतही कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे उद्याही मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढता आला नाही. दुपारी तीन-साडेतीन वाजल्यापासून महापौर बंगल्यावर बेस्टच्या कामगार नेत्यांसह महापालिका आयुक्त, बेस्टचे व्यवस्थापक यांच्यात बैठक झाली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरल्याचे दिसते आहे.

“आम्ही बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडल्या, मात्र, समोरुन कोणताच प्रस्ताव ठेवला नाही. त्यामुळे आम्ही चर्चा कशावर करणार?” अशी खंत  कामगार नेते शशांक राव यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी येऊन फक्त तोडगा काढण्याचे सांगितले. मात्र, पुढे आयुक्त आणि व्यवस्थापक यांनी कोणताच प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला नाही, असेही शशांक राव यांनी सांगितले.

उद्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा मेळावा घेणार असून, त्यात संपाबाबत भूमिका अधिक स्पष्ट करु, अशी घोषणाही यावेळी शशांक राव यांनी केली.

काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या

  • ‘बेस्ट’ उपक्रमाचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे.
  • 2007 पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,930 रुपयांनी सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये त्वरीत वेतननिश्चिती करावी.
  • एप्रिल 2016 पासून लागू करावयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने चर्चा सुरू करावी.
  • 2016-17 आणि 2017-18 करिता पालिका कर्मचाऱ्यांइतकाच बोनस द्यावा.
  • कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न सोडवावा.
  • अनुकंपा भरती तातडीने सुरू करावी.

मुंबईकरांचे हाल

बस नसल्याने प्रवाशांना टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे. मात्र अनेक ठिकाणी हे टॅक्सी चालक संधीचा फायदा घेताना दिसून येत आहेत. संप असल्याने मुंबईकरांना प्रवास करण्यासाठी इतर पर्यायी व्यवस्थेचा वापर करावा लागत आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटीच्या काही बस सोडण्यात येत आहेत, तर जास्तीच्या लोकलही सोडण्यात येत आहे. तरीही अनेकांना टॅक्सीचा आधार घ्यावा लागत आहे. प्रवाशांच्या या मजबुरीचा फायदा घेत टॅक्सी चालक त्यांच्याकडून मनमानी पैसे घेत आहेत. मीटरने न जाता वाट्टेल तेवढे पैसे हे टॅक्सी चालक प्रवाशांकडून लुटत आहेत.

मुंबईच्या टॅक्सीचालकांची ही मनमानी काही नवीन नाही. काही महिन्यांपूर्वी जेव्हा ओला-उबर टॅक्सी चालकांनी संप पुकारला होता. तेव्हाही प्रवाशांकडून अशाच प्रकारची लूट करण्यात आली होती. आधीच बसेस नसल्याने प्रवाशांना टॅक्सीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागत आहे, त्यातच वाट्टेल तो भाडं सांगत हे टॅक्सी चालक प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत आहेत.

मुंबईत पाऊस असो, कुणाचं आंदोलन असो किंवा बँकेचा, सरकारी अधिकाऱ्यांचा, बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप असो, यात हाल मात्र मुंबईकरांचेच होतात, हे पुन्हा एकदा दिसून येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत म्हणून हे कर्मचारी संप पुकारतात, मात्र या सर्वांचा सर्वात जास्त फटका हा सामान्य मुंबईकरांना बसतो. दोन दिवसांपासून बेस्ट कर्मचारी संपावर आहेत, संप मागे घेण्यासाठी सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये अनेक बैठका होत आहेत, तरीही मागील दोन दिवसांपासून हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. यातच टॅक्सीचालकांच्या या मनमानी कारभारामुळे मुंबईकर मात्र त्रस्त झाले आहेत, सरकारने लवकरात लवकर हा संप संपवत बस सेवा पुन्हा सुरु करावी अशी मागणी आता मुंबईकर करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *