Ahmedabad Plane Crash : मोठा आवाज आला, धूर पसरला, किंकाळ्या अन्… प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
अहमदाबादच्या मेघानी भागात एअर इंडियाचे बी-७८७ ड्रीमलाइनर विमान कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. दुपारी उड्डाण घेतल्यानंतर विमान कोसळले. प्रत्यक्षदर्शीने घटनास्थळाचे भयानक वर्णन केले आहे. विमानात २४२ लोक होते, आणि मृत्यूंची संख्या अद्याप स्पष्ट नाही. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

अहमदाबादमधील मेघानी भागात गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे बी-७८७ ड्रीमलाइनर विमान कोसळल्याने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. अहमदाबादवरुन लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच एअर इंडियाचे विमान खाली कोसळले. यानंतर आकाशात धुराचे मोठे लोट आणि जमिनीवर किंकाळ्यांचे आवाज असं भयावह चित्र पाहायला मिळाले. या अपघातात नेमका किती लोकांचा मृत्यू झाला, याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र सध्या अनेक व्हिडीओ आणि फोटो समोर येत आहे. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. या अपघातानंतर एका प्रत्यक्षदर्शीने नेमकं काय घडलं, याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे.
माझं ऑफिस या ठिकाणापासून २०० मीटर अंतरावर आहे. आज दुपारी मी ऑफिसमधून कामानिमित्त बाहेर पडताच मला खूप मोठा आवाज ऐकू आला. त्यानंतर अचानक संपूर्ण परिसरात धूर पसरला. मोठ्याने ओरडण्याचे, किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. सुरुवातीला हे सगळं पाहून मी घाबरलो. माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. पण कसं तरी धीर धरून घटनास्थळाजवळ पोहोचलो. त्यानंतर मी जे पाहिलं ते आणखी भयानक होतं.
किती जणांचा मृत्यू झाला याबद्दलची माहिती नाही
“मी तिथे गेल्यानंतर सर्वत्र मलबा पडला होता. आग लागली होती, मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. समोरचे काहीच स्पष्ट दिसत नव्हते. थोड्यावेळाने धूर कमी झाल्यावर आम्हाला समजलं की आमच्या पायाजवळ विमानाचे पंख पडले आहेत. एक विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे, असे त्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. यात किती जणांचा मृत्यू झाला, याबद्दल आम्हाला माहिती नाही. पण ज्या इमारतीवर हे विमान कोसळलं, त्यात डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थी राहत होते”, अशी माहिती त्यांनी दिली.
विमानात २४२ प्रवासी करत होते प्रवास
एअर इंडियाचे हे विमान अहमदाबाद विमानतळावरून दुपारी १:३९ वाजता (IST) रनवे २३ वरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच कोसळले. उड्डाण घेताच पायलटने एटीसीला (ATC) ‘मेडे’ (MAYDAY) कॉल दिला. परंतु त्यानंतर विमानातून कोणताही संपर्क होऊ शकला नाही. या विमानात एकूण २ पायलट, १० क्रू मेंबर्स आणि २३० प्रवासी असे २४२ लोक होते. त्यांच्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.