विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना किती रुपयांची भरपाई मिळणार? काय आहे कायदा? वाचा…
एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता मृत प्रवाशांच्या मृत कुटुंबियांना आर्थिक भरपाई दिली जाणार आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. यात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाच्या या विमान अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता मृत प्रवाशांच्या मृत कुटुंबियांना आर्थिक भरपाई दिली जाणार आहे. याबाबत काय कायदा आहे? मृतांच्या कुटुंबियांना किती रुपये मिळणार याबाबत माहिती जाणून घेऊयात.
विमान अपघातातबाबत भरपाईबाबतचे नियम काय आहेत?
विमानाने प्रवास करणे सोयीस्कर आहे मात्र ते धोकादायक देखील आहे. एक छोटी शेकडो लोकांच्या मृत्यूचे कारण बनू शकते. त्यामुळे विमान कंपन्या आणि डीजीसीएने काही कठोर नियम बनवले आहेत.देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी हे नियम वेगळे आहेत ते जाणून घेऊयात.
१.४ कोटी रुपयांची भरपाई
भारतात कार्यरत विमान कंपन्या १९९९ च्या मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन कायद्याला बांधील आहेत. याअंतर्गत आंतरराष्ट्रीय प्रवासात प्रवाशाचा मृत्यू झाला किंवा शारीरिक दुखापत झाल्यास त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येक प्रवाशाला सुमारे १.४ कोटी रुपये दिले जातात. तसेच अपघात विमान कंपनीच्या चुकीमुळे झाला असेल या रकमेत आणखी वाढ होऊ शकते.
विम्याची रक्कम वेगळी
विमानप्रवास करताना अनेक विमान कंपन्या प्रवाशांचा विमा उतरवतात. यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतची रक्कम मिळते. तसेच कायमचे अपंगत्व आल्यास ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाते.
टाटाकडून 1-1 कोटींची मदत
या अपघातात मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना टाटा सन्सकडून भरपाईची घोषणा करण्यात आली आहे. टाटा सन्सने याबाबत केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना टाटा ग्रुप १ कोटी रुपयांची मदत देईल. आम्ही जखमींचा वैद्यकीय खर्च देखील उचलू आणि त्यांना आवश्यक असलेली सर्व मदत मिळेल याची खात्री करू. तसेच आम्ही बीजे मेडिकलच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करू. या अकल्पनीय घटनेत आम्ही बाधित कुटुंबांसोबत उभे आहोत.”