Explained : अमेरिकेने आधी या प्रश्नांची उत्तर द्यावी, मग भारताला शहाणपणा शिकवावा
India-Pakistan War Situation : ट्रम्प सरकारमधील नंबर 2 चे नेते उपराष्ट्रपती जेडी वेंस यांनी एक मुलाखत दिलीय. या मुलाखतीत त्यांनी सध्याच्या भारत-पाकिस्तान तणावावर भाष्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन काही जण असा अर्थ काढतील की, त्यांनी भारताला पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. पण मूळात त्यांच्या वक्तव्याचा खूप मोठा अर्थ निघतो, अमेरिकेचा स्वार्थी हेतू दिसतो.

अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारमधील नंबर 2 चे नेते उपराष्ट्रपती जेडी वेंस यांनी काही वक्तव्य केली आहेत. फॉक्स न्यूजच्या ‘स्पेशल रिपोर्ट विद ब्रेट बेयर’ शो मध्ये त्यांनी एक मुलाखत दिली. तिथे त्यांना सध्या भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना जेडी वेंस म्हणाले की, “जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या क्षेत्रीय संघर्षात भारत सावधतेने प्रतिक्रिया देईल” “क्षेत्रीय संघर्ष वाढणार नाही, अशा पद्धतीने भारत या दहशतवादी हल्ल्याला उत्तर देईल” अशी अपेक्षा वेंस यांनी व्यक्त केली. जेडी वेंस यांच्या या वक्तव्यांवरुन काहीजण असा अर्थ काढतील की, पाकिस्तानवर स्ट्राइक करण्यासाठी भारताला अमेरिकेकडून ग्रीन सिग्नल आहे. पण त्याहीपेक्षा जेडी वेंस त्यापुढे जे बोलले, ते जास्त महत्त्वाच आहे. “आम्हाला अपेक्षा आहे की, पाकिस्तान आपली जबाबदारी ओळखून त्यांच्या क्षेत्रातील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी भारताला मदत करेल” जेडी वेंस यांचं हे वक्तव्य खूप महत्त्वाच आहे, त्यातून अनेक वेगवेगळे अर्थ निघतात.
“आम्हाला अपेक्षा आहे की, पाकिस्तान आपली जबाबदारी ओळखून त्यांच्या क्षेत्रातील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी भारताला मदत करेल” जेडी वेंस यांच्या या वक्तव्यावर हसावं की रडावं तेच कळत नाही. कारण मूळात पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या सरकारी यंत्रणांच्या सहभागाचे थेट पुरावे आहेत. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI, त्यांचं लष्कर यांच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला होऊच शकत नाही. जर तिथले स्टेट एक्टर म्हणजे सत्ताधाऱ्यांचा अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग असेल, तर या हल्ल्यामागचे सूत्रधार कसे पकडले जाणार? पाकिस्तानचा याआधीचा इतिहास काय? जेडी वेंस हे जे बोलले, त्यामागे त्यांचा अभ्यास कच्चा नाहीय. त्यांना सगळं माहित आहे, पाणी कुठे मुरतय हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. पण या सगळ्यामागे अमेरिकेचा स्वार्थ दडला आहे.
आज पाकिस्तानने दुसरा कुठला पर्याय ठेवला आहे का?
मूळात म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी हे जेडी वेंस महाशय आपल्या कुटुंबासोबत भारत भ्रमण करत होते. भारताचा त्यांचा पाहुणाचार चाललेला. आता ते मोठा क्षेत्रीय संघर्ष नको म्हणजे सोप्या शब्दात युद्ध नको असा संदेश देत आहेत. खरं म्हणजे युद्ध कोणालाच नको असतं? युद्धात सैनिकांसह निष्पाप, निरपराध नागरिक मारले जातात. पण तुमच्याच देशात तुम्हाला पॅन्ट खाली खेचून मारलं जाणार असेल तर काय मूग गिळून गप्प बसायचं? उत्तर द्यायचं नाही का? कठोर लष्करी कारवाईशिवाय आज पाकिस्तानने दुसरा कुठला पर्याय ठेवला आहे का?.
अमेरिकेच का ऐकावं?
भारत तर 90 च्या दशकापासून दहशतवादाची झळ सोसतोय. आम्ही आमचे हजारो निर्दोष नागरिक यामध्ये गमावले आहेत. अमेरिकेत 2001 साली 9/11 झालं. त्यानंतर अमेरिकेने संयम बाळगला होता का?. इराणचा उच्च सैन्य अधिकारी कासिम सुलेमानीला ड्रोन हल्ल्यात उडवताना विचार केला होता का? अमेरिकन जनतेच्या जीवावर जेव्हा गोष्टी येतात, तेव्हा अमेरिकेने कधी संयम दाखवलाय का? मग आज अमेरिका भारताला संयम बाळगायला का सांगते? आणि त्यांचं का ऐकावं? जेडी वेंस यांच्या स्टेटमेंटचा थेट अर्थ असा आहे की, एक सर्जिकल स्ट्राइक किंवा एअर स्ट्राइक करा आणि गप्प बसा.
अमेरिकेला भारत-पाकिस्तान दोघांची गरज का आहे?
अहो, आमची लढाई त्यापेक्षा पण मोठी आहे. एका एअरस्ट्राइकने किंवा सर्जिकल स्ट्राइकने काम होणार नाही. कारण पाकिस्तान म्हणजे कुत्र्याचं शेपूट आहे वाकडं ते वाकडच राहणार. अमेरिकेला माहितीय संपूर्ण जगात दहशतवाद पसरला, पाकिस्तान त्यामागचा प्रायोजक आहे. मग, त्यांना F-16 फायटर विमान का दिली? दहशतवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी दिली ना, मग त्यांनी तीच विमान 2019 भारतावर कशी चालवली? मूळात अमेरिकेला कोणाशी काही देणघेणं नाही. त्यांना त्यांचा फायदा, हित महत्त्वाच आहे. त्यांना भारत-पाकिस्तान दोन्ही देशांना खेळवायचं आहे. अमेरिकन सैन्य आता अफगाणिस्तानमधून बाहेर पडलं, म्हणून पाकिस्तानच महत्त्व तसं कमी झालय. पण तरीही त्यांना भारताविरोधात पाकिस्तानची गरज आहे. आणि चीनच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भारताची गरज आहे.
‘ये नया इंडिया हैं, घर मे घुसके मारेंगे’
2008 साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर 2016 साली पठाणकोट येथील एअर फोर्सच्या बेसवर हल्ला झाला. त्यावेळी पाकिस्तानला पुरावे दिले होते. काय कारवाई केली त्यांनी? जेडी वेंस यांच्यासाठी संयमाचे सल्ले देणं खूप सोपं आहे. पण जे भोगतायत, त्यांचं दु:ख त्यांनाच माहित. सध्या सत्तेवर असलेल्या सरकारने जे त्यांना करायचं आहे, ते केलय. याआधी दोनदा पाकिस्तानात घुसून कारवाई केलीय. आत्ताही पाकिस्तानला समजेल अशा भाषेत नक्कीच उत्तर मिळणार. त्यामुळे जेडी वेंस यांनी त्यांच्या संयमाचे सल्ले पाकिस्तानला द्यावेत. ‘ये नया इंडिया हैं, घर मे घुसके मारेंगे’
