माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, परमेश्वर आणि पाठबळ देणाऱ्या प्रत्येकाचा मनापासून आभारी : अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे (Amit Shah Corona Report Negative).

माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, परमेश्वर आणि पाठबळ देणाऱ्या प्रत्येकाचा मनापासून आभारी : अमित शाह

नवी दिल्ली :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे (Amit Shah Corona Report Negative). अमित शाह यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. “आज माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मी परमेश्वराचा आभारी आहे. यादरम्यान ज्यांनी माझ्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली, मला आणि माझ्या कुटुंबियांना मानसिक पाठबळ दिलं, अशा प्रत्येकाप्रती मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी काही दिवस आयसोलेशमध्ये राहीन”, असं अमित शाह म्हणाले (Amit Shah Corona Report Negative).

अमित शाह यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. जवळपास दहा ते बारा दिवसांच्या उपचारानंतर शाह यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांनी रुग्णालयाचे डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचेदेखील आभार मानले आहेत. “कोरोनाविरोधात लढाईत मला मदत करणारे मेदांता रुग्णालयाचे सर्व डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफचा मी मनापासून आभारी आहे”, असं अमित शाह म्हणाले आहेत.

अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 2 ऑगस्ट रोजी समोर आली होती. खुद्द अमित शाह यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. “कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसल्याने मी माझी चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे. मी आवाहन करतो, तुमच्यापैकी जो कोणी गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आला असेल, त्यांनी कृपया स्वत: विलगीकरणात राहावे आणि आपली चाचणी करुन घ्यावी” असे आवाहन अमित शाह यांनी केले होते.

देशातील दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण

देशातील अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

केंद्रीय राज्यमत्री अर्जुन सिंह मेघवाल यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. येडियुरप्पा यांची कन्या पद्मावतीही कोरोना पॉझिटिव्ह आहेत, सुदैवाने पुत्र विजयेंद्र यांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर येडियुरप्पा यांच्या कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी समोर आले.

कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *