Delhi Red Fort Blast : आता ईडी लागणार दहशतवाद्यांच्या मागे, दिल्ली स्फोट प्रकरणात सरकारचा मोठा निर्णय!
दिल्ली स्फोटाच्या प्रकरणात रोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात बेड्या ठोकण्यात आलेल्या डॉक्टरांचा संबंध थेट तुर्कीएपर्यंत असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Delhi Red Fort Blast : दिल्ली लाल किल्ला परिसरात झालेल्या कार स्फोटामुळे देश हादरला आहे. या कार स्फोटासाठी व्हाईट कॉलर मॉड्यूल वापरण्यात आले. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी तपाससंस्थांच्या रडारवर काही डॉक्टर आले आहेत. या डॉक्टरांची कसून चौकशी केली जात आहे. i20 कारमध्ये हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. त्यानंतर i20 कारनंतर आता लाल रंगाच्या फोर्ड कारचाही पोलीस शोध घेत आहेत. या स्फोटात सहभागी असणाऱ्यांना सोडणार नाही, असा प्रण केंद्र सरकारने केला आहे. याच कारणामुळे सरकारने हा तपास एनआयएकडे सापवलेला आहे. असे असतानाच आता या प्रकरणाच्या तपासात ईडीनेही उडी घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता दिल्ली स्फोटाप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेमका काय निर्णय घेण्यात आला?
लाल किल्ला परिसर स्फोटातील मृतांचा आकडा आता 13 वर पोहोचला आहे. या प्रकरणी हरियाणातील अल फलाह विद्यापीठाशी निगडित असलेल्या काही डॉक्टरांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांची सध्या चौकशी केली जात आहे. पोलिसांनी केलेल्या छापेमारीत या डॉक्टरांकडे अनेक संशयास्पद गोष्टी आढळून आल्या आहेत. या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे, याचा आढावा घेण्यासाठी अमित शाहा यांनी आज (13 नोव्हेंबर) बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी दिल्ली स्फोटाचा तपास करण्यासाठी ईडीलाही काही अधिकार दिले आहेत. आता ईडी एनआयएसोबत तपासात उतरणार आहे. अल फलाह विद्यापीठाशी निगडित एका डॉक्टरच्या आर्थिक व्यवहाराची यात चौकशी केली जाणार आहे. डॉक्टरांचे काही संशयास्पद व्यवहार होते का? याची ईडी चौकशी करणार आहे. सोबतच त्यांना फंडिंग कुठून मिळाली? या अंगानेही ईडी तपास करणार आहे.
आतापर्यंत नेमकी काय माहिती समोर आली आहे?
दिल्ली स्फोटाप्रकरणी अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या स्फोटाचं तुर्कीए कनेक्शन समोर आलं आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले डॉ. उमर, डॉ. मुजम्मिल हे दोघे तुर्कीएत गेले होते, असे सांगण्यात येत आहे. डॉ. उमर आणि डॉ. मुजम्मिल हे एका संशयित टेलिग्राफ चॅनलशी जोडले गेले होते. त्यानंतर त्यांनी तुर्कीएचा दौरा केला होता. तुर्कीए आणि अफगाणिस्तानमधील नंगरहार प्रांतातील हँडलर या दोघांच्या संपर्कात होते. टेलिग्राफच्या चॅनेलवरूनच भारतात दहशतवादी हल्ला करण्याचे निर्देश दिले जात होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता भविष्याच्या तपासात नेमके कोणते धक्कादायक खुलासे होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
