1 कोटी रुपये बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा; सुरक्षा दलांना मोठं यश
कुख्यात माओवादी कमांडर हिडमावर किमान 26 मोठ्या हल्ल्यांचा सूत्रधार असल्याचा आरोप होता. छत्तीसगड - आंध्र प्रदेश सीमावर्ती भागात झालेल्या चकमकीत त्याचा खात्मा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षीस होतं.

छत्तीसगड – आंध्र प्रदेश सीमावर्ती भागात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे. या चकमकीत सहा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. माओवादी संघटनेच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेला हिडमा या चकमकीत ठार झाल्याचं कळतंय. माओवाद्यांचे मोठे नेते बैठक घेत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी हल्ला केला. याठिकाणी मोठ्या प्रमाणात माओवादी असल्यामुळे चकमकीच्या ठिकाणी पोलिसांच्या तुकडया वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या चकमकीत सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे.
आंध्र प्रदेशात कुख्यात माओवादी कमांडर माडवी हिडमा (वय 43 वर्षे) याला ठार मारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हिडमावर किमान 26 मोठ्या हल्ल्यांचा सूत्रधार असल्याचा आरोप होता. 43 वर्षीय हिडमा 2013 च्या दरभा व्हॅली हत्याकांड आणि 2017 च्या सुकमा हल्ल्यासह किमान 26 सशस्त्र हल्ल्यांसाठी जबाबदार होता. आंध्र प्रदेश पोलिसांनी अल्लुरी सीताराम राजू (एएसआर) जिल्ह्यातील मारेदुमिल्ली इथं केलेल्या कारवाईत माडवी हिडमा आणि इतर पाच माओवादी मारले गेले.
हिडमावर 1 कोटी रुपयांचं होतं बक्षीस
1981 मध्ये छत्तीसगडमधील सुक्मा इथल्या पूर्ववर्ती भागात जन्मलेला हिडमा याने पीएलजीए बटालियन क्रमांक 1 चं नेतृत्व केलं होतं. सीपीआयच्या (माओवादी) केंद्रीय समितीचा तो सर्वांत तरुण सदस्य होता. त्याच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिडमाची दुसरी पत्नी राजे उर्फ राजक्कादेखील ठार झाल्याचं सूत्रांकडून समजतंय.
हिडमाकडून मोठमोठे हल्ले
2010 चा दंतेवाडा हल्ला- 76 सीआरपीएफचे जवान शहीद 2013 च्या झिरम व्हॅली हत्याकांडात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह 27 जणांचा मृत्यू 2021 मध्ये सुकमा-बिजापूर हल्ला– 22 सुरक्षा कर्मचारी शहीद
वयाच्या चौदाव्या वर्षापासून हिडमा हा माओवादी संघटनेत सक्रिय झाला होता. 500 पेक्षा जास्त हत्या करणारा मास्टरमाइंड हिडमा माओवाद्यांच्या मोठा नेतृत्व करणारा नेता होता. छत्तीसगडमधील प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार महेंद्र कर्मा यांच्यासह 40 नेत्यांना एकच वेळी ठार मारणारा हाच मुख्य सूत्रधार होता. त्याच्या सुरक्षेत जवळपास 40 माओवादी नेहमीच कार्यरत असायचे. देशातला मोस्ट वांटेड म्हणून हिडमाची ओळख होती.
गेल्या काही वर्षांत हिडमाने बस्तरमधील काही सर्वांत घातक माओवादी कारवायांचं नेतृत्व केलंय. त्यामुळे हिडमाच्या मृत्यूला बस्तरमधील माओवादी नेटवर्कविरुद्धचं सर्वांत मोठं यश मानलं जात आहे. या ऑपरेशनबद्दल आंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक हरीश कुमार गुप्ता म्हणाले, “अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील मरेदुमिल्ली इथं पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. ही चकमक सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान झाली. या चकमकीत एका प्रमुख माओवादी नेत्यासह सहा माओवादी ठार झाले आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू आहे.”
