अरविंद केजरीवालांच्या ‘आप’मध्ये मोठी फूट, 15 जणांचे राजीनामे, उभा करणार नवा पक्ष; दिल्लीच्या राजकारणात भूकंप!
अरविंद केजरीवाल यांच्या पक्षात उभी फूट पडली आहे. दिल्लीमध्ये तब्बल 15 जणांनी आपले राजीनामे दिले आहेत.

Delhi AAP Councillor Resigned : दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. येथे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. दिल्लीमध्ये आप पक्षाच्या एकूण 15 नगरसेवकांनी आपले राजीनामे दिले असून लवकरत आम्ही नवा पक्ष स्थापन करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. नगरसेवकांच्या या निर्णयानंतर आप पक्षाच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
नव्या पक्षाचं नाव काय?
मिळालेल्या माहितीनुसार बंड केलेल्या नगरसेवकांनी इंद्रप्रस्थ विकास पार्टी नावाचा नवा पक्ष स्थापन केला आहे. राजीनामा देणाऱ्या नगरसेवकांत हेमनचंद गोयल, दिनेश भारद्वाज, हिमानी जैन, उषा शर्मा, साहीब कुमार, राखी कुमार, अशोक पांडेय, राजेश कुमार, अनिल राणा, देवेंद्र कुमार या नगरसेवकांचा समावेश आहे.
नेमकं राजीनामा कशामुळे दिला?
दिल्लीत सत्तेत असूनही आम्ही शहराचा विकास करू शकलो नाही. पक्षातील अंतर्गत कलहामुळे हा विकास होऊ शकला नाही, असं बंडखोरी केलेल्या नगरसेवकांनी म्हटलंय.
प्रत्येक नगरसेवकाला 5 कोटींची ऑफर
नगरसेवकांच्या या निर्णयानंतर आम आदमी पार्टीनं भूमिका जाहीर केली आहे. “दिल्ली महापालिकेच्या महपौर निवडणुकीच्या काळापासून आमच्या नगरसेवकांना फूस लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक नगरसेवकाला तब्बल 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. भाजपाकडे महापालिकेत स्थायी समिती किंवा वॉर्ड समिती स्थापन करण्यासाठी बहुमत नाहीये. त्यासाठीच नगरसेवाकांना खरेदी केले जात आहे,” असा गंभीर आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
यामागे भाजपाचाच हात
महापौर निवडणुकीच्या काळातच आम्ही भाजपाचा नगरसेवक खरेदी करण्याचा प्रयत्न समोर आणला होता. या कामामागे भाजपाचाच हात आहे. येणाऱ्या काळात हे स्पष्ट होईलच, असंही आम आदमी पार्टीने म्हटलंय.
भाजपा नेमकं काय उत्तर देणार?
दरम्यान, या राजीनाम्यांमुळे दिल्लीत आम आदमी पार्टीला मोठा फटका बसला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षासाठी ही मोटी हानी असल्याचे म्हटले जात आहे. बंडखोर नगरसेवाकांनी नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता आगामी काळात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आप पक्षाने भाजपावर केलेल्या थेट आरोपांचे भाजपाच्या नेत्यांकडून काय उत्तर दिले जाणार? हेही पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
