काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची; परस्परांवर पातळी सोडून टीका

काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची; परस्परांवर पातळी सोडून टीका

गेहलोत यांनी गुलाम नबी आझाद आणि पी. चिदंबरम यांना पक्षाच्याबाहेर तुमची काय पत आहे, असा थेट सवाल विचारला. | Ashok Gehlot

Rohit Dhamnaskar

|

Jan 23, 2021 | 12:10 PM

नवी दिल्ली: काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC meeting) शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत प्रमुख नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलेले पाहायला मिळाले. या सगळ्या प्रकारामुळे बैठकीला उपस्थित असणाऱ्या राहुल गांधी यांनाही मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस अध्यक्षाची निवड आणि कार्यकारिणीची निवडणूक या सगळ्यावरुन चर्चा सुरु असताना अशोक गेहलोत आणि आनंद शर्मा यांच्यात वाद झाला. (Ashok Gehlot vs Anand Sharma in CWC meeting)

अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहणाऱ्या 23 ज्येष्ठ नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले. या नेत्यांनी नेतृत्त्वबदलाची मागणी केली होती. या सगळ्या नेत्यांना जाब विचारताना अशोक गेहलोत यांनी अत्यंत तिखट भाषेचा वापर केला. त्यामुळे आनंद शर्माही प्रचंड संतापले. त्यांनी अशोक गेहलोत यांना तितक्याच तिखट भाषेत प्रत्युत्तर दिले.

नेमके काय घडले?

सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत गेहलोत यांनी गुलाम नबी आझाद आणि पी. चिदंबरम यांना पक्षाच्याबाहेर तुमची काय पत आहे, असा थेट सवाल विचारला. तेव्हा आनंद शर्मा आणि मुकूल वासनिक यांनी काँग्रेस पक्षाची घटना वाचून दाखवण्यास सुरुवात केली. कार्यकारिणीची निवडणूक जून महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात तुमचा अडथळा येत असल्याचे गेहलोत यांनी आनंद शर्मा यांना सुनावले. जे नेते कधी लोकांमधून निवडून आले नाहीत, तरीही यूपीए सरकारमध्ये चांगल्या जबाबदाऱ्या मिळाल्या. अशा लोकांना अंतर्गत निवडणुकीची मागणी करण्याचा काय हक्क आहे, असे अशोक गेहलोत यांनी विचारले.

काँग्रेस पक्षाने सध्या इतर मुद्द्यांकडे लक्ष दिले पाहिजे. गांधी परिवाराची कृपा असल्यामुळेच तुम्ही इतक्या मोठ्या पदांवर बसलेले आहात, असेही त्यांनी बंडखोरांना सुनावले.

तेव्हा संतापलेल्या आनंद शर्मा यांनी गेहलोत यांच्या भाषेबाबत आक्षेप घेतला. केवळ चाटुगिरी करण्यासाठी अपमानजनक भाषेचा वापर करु नका, असे आनंद शर्मा यांनी गेहलोत यांना सुनावले. पक्षांतर्गत निवडणुकांची मागणी करणारे नेते इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेसमध्ये असल्याची आठवण शर्मा यांनी करुन दिली. त्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतील वातावरण प्रचंड तापले होते.

अखेर राहुल गांधी यांची मध्यस्थी

बैठकीतील वातावरण प्रचंड तापल्यामुळे अखेर राहुल गांधी यांना मध्यस्थी करावी लागली. अशोक गेहलोत यांनी इतक्या तिखट भाषेचा वापर करायला नको पाहिजे होता. आपण निवडणुका घेऊन हा विषय संपवून टाकू, असे राहुल गांधी यांनी म्हटले. त्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीने जून महिन्यात पक्षांतर्गत निवडणुका घेण्याचा निर्णय जाहीर केला.

संबंधित बातम्या:

शेतकरी आंदोलन ते अर्थव्यवस्था, CWC बैठकीत सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रवादाचं सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश; सोनिया गांधींचा अर्णव गोस्वामींवर हल्ला

सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास नाही का? CWC बैठकीत अशोक गेहलोत आक्रमक

(Ashok Gehlot vs Anand Sharma in CWC meeting)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें