आता टाटा हॉस्पिटल, एम्सच्या साथीने पतंजलीतर्फे उपचार होणार, बाबा रामदेव यांची मोठी घोषणा!
हरिद्वार येथे पतंजली विद्यापीठ, पतंजली संशोधन संस्था आणि केंद्रीय संस्कृत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय अनामयम आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

Baba Ramdev : पतंजलीतर्फे आयुर्वेदाच्या माध्यमातून वेगवेगळ्या आजारांवर उपचार केले जातात. वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त असलेल्या हजारो रुग्णांवर पतंजलीने आयुर्वेदाच्याच मदतीने यशस्वीपणे उपचार केलेले आहेत. दरम्यान, पंतजली विद्यापीठाचे कुलपति बाबा रामदेव यांनी मोठी घोषणा केली आहे. आता लवकरच एम्स, टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि सर गंगा राम हॉस्पिटलच्या सहकार्याने पतंजली आयुर्वेद रुग्णालयात वेगवेगळ्या आजारांवर उपचार केले जातील, असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.
बाबा रामदेव यांनी कोणती घोषणा केली?
हरिद्वार येथे पतंजली विद्यापीठ, पतंजली संशोधन संस्था आणि केंद्रीय संस्कृत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय अनामयम आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या कार्यक्रमात रामदेव बाबा यांनी ही घोषणा केली. यावेळी बोलताना त्यांनी एम्स, टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि सर गंगा राम हॉस्पिटलच्या सहकार्याने आधुनिक पद्धतींचा वापर करून पतंजली आयुर्वेद रुग्णालयात वेगवेगळ्या आजारांवर उपचार केले जातील. विशेष म्हणजे हे उपचार कमी खर्चात केले जातील. या मोहिमेच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे.
16 राज्यांतील 300 पेक्षा अधिक प्रतिनिधींचा सहभाग
आयुर्वेद आणि आधुनिक औषधांचे एकीकरण आणि समन्वय साधण्याच्या उद्देशाने तसेच जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला देशभरातली सुमारे 16 राज्यांतील 200 शैक्षणिक संस्थांमधील 300 पेक्षा अधिक मान्यवरांनी भाग घेतला. हा सहभाग ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी होता. या परिषदेत देशातील वेगवेगळ्या प्रतिष्ठित वैद्यकी आणि शैक्षणिक संस्थांमधील तज्ज्ञ, संशोधकही सहभागी झाले होते.
कार्यक्रमात वेगवेगळ्या करारांवर स्वाक्षऱ्या
या परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात रामदेव बाबा, पंतजली विद्यापीठाचे कुलगुरू, आयुर्वेद शिरोमणी आचार्य बालकृष्ण तसेच अन्य पाहुण्यांनी मिळून एकूण तीन पुस्तकांचे प्रकाशन केले. आयआयटी रोपरच्या डॉ. श्रेया, डॉ. राधिका आणइ डॉ. मुकेश तसेच पंतजली विद्यापीठाचे गुलगुरु बालकृष्ण यांनी शिक्षण, संशोधनाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
