Bengaluru Bed Scam: कोरोना बेड घोटाळ्याला भाजपकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न, तेजस्वी सूर्या म्हणतात….

बंगळुरु महानगरपालिकेचे काही अधिकारी, रुग्णालयातील कर्मचारी आणि काही दलाल कोविड बेडच्या वाटपाचे रॅकेट चालवत होते. | Tejasvi Surya bengluru bed scam

Bengaluru Bed Scam: कोरोना बेड घोटाळ्याला भाजपकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न, तेजस्वी सूर्या म्हणतात....
तेजस्वी सूर्या, भाजप खासदार

बंगळुरु: कोविड बेडच्या वाटपात सुरु असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी आता कर्नाटकातील वातावरण तापले आहे. भाजप खासदार तेजस्वी सूर्या (tejasvi surya) यांच्याकडून या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याप्रकरणी त्यांनी केलेल्या वादग्रस्त आणि गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी संबंधित घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. (BJP MP Tejasvi Surya finds communal twist in bengluru bed scam)

याप्रकरणी तेजस्वी सूर्या यानी बंगळुरू महानगरपालिकेने वॉर रूममध्ये नियुक्त केलेल्या 17 मुस्लीम कर्मचाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सहआयुक्त संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांत दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. या प्रकरणी एका महिलेसहीत चार जणांना अटक करण्यात आलीय.

काय आहे प्रकरण?

बंगळुरु महानगरपालिकेचे काही अधिकारी, रुग्णालयातील कर्मचारी आणि काही दलाल कोविड बेडच्या वाटपाचे रॅकेट चालवत होते. यामध्ये रुग्णांना लाच घेऊन कोविड बेड उपलब्ध करुन दिला जात होता. रुग्णालयातील एखादा बेड रिक्त झाल्यानंतर तो ब्लॉक केला जात असे. त्यानंतर गरजू व्यक्तीकडून पैसे घेऊन त्याला हा बेड दिला जात असे. एखादा बेड विकला गेला नाही तर तो पुन्हा अनब्लॉक केला जात असे.

तेजस्वी सूर्या यांचा 17 मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर सवाल?

भाजप नेते आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी बंगळुरू महानगरपालिकेच्या वॉररुममध्ये 17 मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना या प्रकरणाला ‘धार्मिक रंग’ देण्याचाही प्रयत्न केला आहे. तेजस्वी सूर्या यांचा एक व्हीडिओ समोर आला आहे. त्यामध्ये तेजस्वी सूर्या यांनी म्हटले आहे की, हे लोक कोण आहेत, त्यांना कोणी नोकरीवर ठेवले? तुम्ही एखादा मदरसा चालवण्यासाठी लोकांची भरती केली आहे का?, असा सवाल तेजस्वी सूर्या यांनी उपस्थित केला.

पालिका आयुक्त सरफराज नवाज यांनाही आरोपाच्या झळा

या आरोपाच्या झळा महानगरपालिका आयुक्त सरफराज नवाज यांच्यापर्यंतही पोहचल्यात. माझ्यावर आरोप करून या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय यासाठी मला दु:ख होतंय, अशी प्रतिक्रिया नवाज यांनी व्यक्त केली. बेड वाटप प्रक्रियेशी आपला काहीही संबंध नाही.

मी सध्या कोविड केअर सेंटर आणि कचरा व्यवस्थापनाच्या कामात गुंतलो आहे. बेड वाटपात माझा कोणताही सहभाग नव्हता. मला त्याबद्दल काहीही माहिती नाही, असे सरफराज नवाज यांनी म्हटले. त्यानंतर आपण देखरेख तेजस्वी सूर्या यांनी आपण नवाझ यांच्या नावाचा उल्लेख केला नसल्याचे स्पष्टीकरण देतानाच माफीही मागितली.

(BJP MP Tejasvi Surya finds communal twist in bengluru bed scam)