महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मोठा दिवस, ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसीय दौऱ्यावर, अजेंडा काय?

गेल्या आठवड्यातच ममता बॅनर्जींनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बंगाल संबंधातल्या विविध मुद्यांवर चर्चा केली होती. त्यात बीएसएफचं वाढलेलं कार्यक्षेत्र प्रामुख्यानं मुद्दा होता. महाराष्ट्रातल्या राजकीय, व्यावसायिक भेटीगाठीतून काय निघतं याकडेही सर्वांना उत्सुकता आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मोठा दिवस, ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसीय दौऱ्यावर, अजेंडा काय?
ममता बॅनर्जी आज मुंबईत दुपारी शरद पवारांना भेटणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून महाराष्ट्राच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. ह्या तीन दिवसात त्यांच्या अजेंड्यावर काही राजकीय आणि व्यावसायिक भेटीगाठी आहेत. त्यातली सर्वात महत्वाची भेट आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची. पण मुख्यमंत्र्यांवर अलिकडेच सर्जरी झालीय. त्यापार्श्वभूमीवर दोघांची भेट होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जातेय. पण ममता बॅनर्जींच्या भेटीनं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघणार का अशी चर्चा मात्र सुरु झालीय.

ममता बॅनर्जींच्या राजकीय भेटी

ममता बॅनर्जी ह्या आजच मुंबईत पोहोचणार आहेत. पुढचे तीन दिवस त्यांचा तळ हा मुंबईत असेल. ह्या तीन दिवसाच्या काळात सर्वात महत्वाची राजकीय भेट असेल ती शरद पवार यांच्यासोबत. ममता बॅनर्जींच्या प्रचारासाठी शरद पवार हे पश्चिम बंगालला गेले होते आणि त्यानंतर आता ममता ह्या पवारांच्या भेटीसाठी मुंबईत असतील. गेल्या काही काळात दोन्ही नेत्यांचं काँग्रेससोबत देशपातळीवर फारसं जमून नाही. पवारांना यूपीएचं चेअरमन करावं अशी मागणी अधूनमधून उठत असते आणि त्यावर काँग्रेस नेते नाराज होतात. गेल्या आठवड्यात तर ममता बॅनर्जी ह्या दिल्लीत होत्या. त्यांनी पंतप्रधानांसह महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या पण काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधींची भेट मात्र घेतली नाही. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोनियांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवली होती. त्यावर ममतांच्या टीएमसीनं बहिष्कार टाकला. त्यामुळेच काँग्रेस आणि ममता यात सध्या तरी फारसं जमून नाही. त्यामुळेच मुंबई दौऱ्यात ममता ह्या फक्त शरद पवारांनाच भेटतील हे निश्चित आहे. एखाद्या काँग्रेस नेत्याची भेट अजेंड्यावर नाही. पवार-ममतांमध्ये देशपातळीवरील राजकीय निर्णयांची, मुद्यांची चर्चा होऊ शकते.

उद्धव ठाकरेंची भेट

ममता बॅनर्जींच्या अजेंड्यावर दुसरी मोठी भेट असेल ती मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट. मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये आहे. त्यामुळे ही भेट कशी होणार याबाबत साशंकता आहे. पण सामनानं दिलेल्या वृत्तानुसार उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची भेट होणार आहे. नरेंद्र मोदी सरकारच्याविरोधात गेल्या दोन एक वर्षात जर कुणी पाय रोवून उभं ठाकलं असेल तर ते आहेत ममता बॅनर्जींची टीएमसी आणि ठाकरेंची शिवसेना. दोन्ही ठिकाणी केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन राज्य सरकारांना नामोहरम करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याचा आरोप केला जातोय. पण तरीही ठाकरे-बॅनर्जींनी भाजपला जशास तसं उत्तर दिलंय. त्याच पार्श्वभूमीवर ह्या दोन्ही नेत्यांची भेट महत्वाची मानली जातेय.

बिझनेस बैठक

ममता बॅनर्जींच्या अजेंड्यावर जशा राजकीय भेटी आहेत तशाच काही व्यावसायिक भेटीही आहेत. पुढच्या वर्षी म्हणजेच एप्रिल महिन्यात पश्चिम बंगालमध्ये बंगाल ग्लोबल बिझनेस समिट आहे. त्यानिमित्तानं ममता बॅनर्जी मुंबईतल्या बड्या व्यावसायिकांना निमंत्रण देणार आहेत. ती समिट बॅनर्जींसाठी महत्वाची आहे. त्यामुळेच राजकीय भेटींसोबतच व्यावसायिकांसोबतच्या भेटीवर लक्ष असेल.

गेल्या आठवड्यातच ममता बॅनर्जींनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बंगाल संबंधातल्या विविध मुद्यांवर चर्चा केली होती. त्यात बीएसएफचं वाढलेलं कार्यक्षेत्र प्रामुख्यानं मुद्दा होता. महाराष्ट्रातल्या राजकीय, व्यावसायिक भेटीगाठीतून काय निघतं याकडेही सर्वांना उत्सुकता आहे.

हे सुद्धा वाचा:

तुम्हाला नवीन व्यवयाय सुरू करायचाय? तर जीएसटीबाबत जाणून घ्या ‘हे’ महत्त्वाचे नियम

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांची मुंबई विमानतळाला भेट; मुंबकरांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

Skin Care : ब्राउन शुगर फक्त आरोग्यासाठी नव्हेतर त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर!

Published On - 6:59 am, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI