
Nitish Kumar Bahubali : बिहारमधील निवडणूक देशाचा राजकारणाचा मूड सांगते असे म्हटले जाते. सध्या हा जनता नितीशबाबूंवर फिदा असल्याचे दिसून येते. गेल्या 20 वर्षांपासून नितीश कुमार यांच्याभोवतीच बिहारचे राजकारण फिरताना दिसते. यावेळीही पण जनतेने त्यांच्या पक्षाला, जेडीयूला पसंती दिल्याचे दिसून येते. सकाळच्या सत्रात जनता दल (संयुक्त) हा पक्ष सुरुवातीला पिछाडीवर होता. पण आता हा पक्ष आघाडीवर आला आहे. भाजपच्या तोडीस तोड कामगिरी नितीशबाबूंनी करून दाखवली. तब्येतेची कुरबुरी असतानाही त्यांनी चमकदार कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तेजस्वी यादवच नाही तर भाजपचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये JDU टॉपर
बिहारमध्ये जेडीयू टॉपर आहे. अब चौथी बार नितीश सरकार ही घोषणा खरी होताना दिसत आहे. बिहारमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत 243 विधानसभा जागांसाठी मतगणना सुरू आहे. दोन्ही टप्प्यातील निवडणुकीसाठी 46 केंद्रांवर मतगणना सकाळी 8 वाजता सुरु झाली आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत एनडीए 156 जागांवर तर महाआघाडी 81 जागांवर आघाडीवर आहे. सध्याच्या निकालानुसार, जेडीयूने 70 जागांवर आघाडी घेतली आहे. आरजेडी 51 जागांवर आली आहे. तर भाजप 70 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे मतदारांनी पुन्हा नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवल्याचे चित्र आहे. नितीश कुमार यांच्यासाठी ही आनंदवार्ता आहे. त्यांच्याविरोधात तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोर यांनी रान उठवलं होतं. पण त्याचा तसा परिणाम झालेला दिसत नाही.
जेडीयूची अविश्नसनीय कामगिरी
या निवडणुकीत जेडीयू नावालाही राहणार नाही असा दावा प्रशांत किशोर यांनी केला होता. तर भाजप महाराष्ट्राप्रमाणेच नितीश कुमार यांची परिस्थिती करेल, असा दावा करण्यात येत होता. पण या सर्व दाव्यांना नितीश कुमार हे पुरुन उरल्याचे दिसून येत आहे. एनडीएला महाआघाडीच्या तुलनेत दुप्पट जागा मिळताना दिसत आहेत. यामध्ये जेडीयूने सर्वाधिक आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सकाळी 10.15 वाजेपर्यंत 219 विधानसभा मतदारसंघाचे कल हाती आले आहेत. त्यामध्ये जेडीयूने 70 जागांवरील आघाडीसह मुसंडी मारली आहे.
भाजपचे मुख्यमंत्री पदाचं स्वप्न भंगलं?
एक्झिट पोलमध्ये भाजप हा बिहार निवडणुकीत मोठी मुसंडी मारेल असे चित्र होते. भाजप येथे निर्णायक भूमिका वठवेल असे बोलले जात होते. भाजपने मुख्यमंत्री पदासाठी नितीश कुमार यांचेच नाव समोर आणले असले तरी निवडणूक प्रचारातील चर्चा मात्र वेगळीच होती. नितीश कुमार यांचा पक्ष दमदार कामगिरी करू शकणार नाही आणि भाजपकडे मुख्यमंत्रीपद चालून येईल असा दावा करण्यात येत होता. पण नितीश कुमार यांच्या जेडीयूमुळे भाजपचं हे स्वप्न भंगल्याची चर्चा सुरू झाली आहे.