देशात फोडाफोडीचं राजकारण सुरूच; विधानपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान आणखी एक गेमचेंजर पक्ष फुटला?
देशात फोडाफोडीचं राजकारण सुरूच असल्याचे दिसून येत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान आणखी एक गेमचेंजर पक्ष फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

बिहारमध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीदरम्यान NDA आघाडीमध्येच फोडाफोडी सुरू झाली आहे. शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी एनडीएकडून जेडीयूने आनंद पुष्कर यांना उमेदवार घोषित केलं आहे. तर RLM कडून प्रदेश महासचिव आणि प्रदेश मुख्य प्रवक्ते रामपुकार सिन्हा हे अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत.
रामपुकार सिन्हा यांनी शिक्षक मतदारसंघ असलेल्या सारणच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणुकीसाठी अर्ज देताना RLM चे तीन आमदार देखील होते. आमदार आलोक कुमार सिंह, आमदार माधव आनंद, रामेश्वर महतो अशी पाठिंबा देणाऱ्या आमदारांच नावे आहेत. तिघांनी रामपुकार सिन्हा यांना पाठिंबा दिलाय. RLM च्या तिन्ही आमदारांनी अपक्ष उमेदवर रामपुकार सिन्हा यांना पाठिंबा दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. कारण राज्यसभा खासदार उपेंद्र कुशवाह यांचा RLM पक्ष NDA चा भाग आहे. सारणच्या जागेवरून NDA ने JDU चे आनंद पुष्कर यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यामुळे RLM च्या आमदारांनी एनडीएने घोषित केलेल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. परंतु या तिन्ही आमदारांनी रामपुकार सिन्हा यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे RLM पक्ष फुटल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी पक्षात कोणतीही फूट पडली नसल्याचा दावा केला आहे. आरएलएम पक्ष एनडीए सोबत आहे. NDA च्या अधिकृत पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देत आहे. पक्षातील कोणत्याही आमदारांनी बंडखोरी केलेली नाही. दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष आलोक सिंह यांचं म्हणणं आहे की, तिन्ही आमदार हे रामपुकार सिन्हा यांच्यासोबत आहेत. रामपुकार सिन्हा हे बराच वर्षांपासून पक्षाचं काम करत आहेत. यामुळे आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. रामपुकार सिन्हा यांना पाठिंबा देणे म्हणजे NDA सरकारला दिलेला पाठिंबा मागे घेणे नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय लोक मोर्चाचे एकूण चार आमदार आहेत. त्यातील तीन आमदारांनी रामपुकार सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. तर चौथ्या आमदार या उपेंद्र कुशवाहा यांच्या पत्नी स्नेहता आहेत. सारणच्या शिक्षक मतदारसंघातून आनंद पुष्कर, रामपुकार सिन्हा यांच्यासहित जन सुराज पक्षाचे अफाक अहमद देखील मैदानात उतरले आहेत.
