भाजपला मिळू शकते पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष, स्पर्धेत कोणाची नावे चर्चेत?
भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ एखाद्या महिलेच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपमध्ये काही नावांवर चर्चा सुरु झाली आहे. त्यातून एक नाव निश्चित झाल्यास भाजपच्या त्या पहिल्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष असणार आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ नंतर भारतीय जनता पक्षात संघटनात्मक बदलाची प्रक्रिया वेगाने सुरु झाली. भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडीचा प्रक्रिया सुरु आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ एखाद्या महिलेच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महिलेची निवड होऊ शकते. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीत मिळालेल्या यशात महिलांचा वाटा मोठा होता. त्यामुळे महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिला राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकते.
जे.पी.नड्डा यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ जानेवारी २०२३ मध्ये पूर्ण झाला होता. परंतु पक्षाने त्यांना जून २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली. आता नवीन अध्यक्षाची घोषणा लवकरच होऊ शकते. त्यासाठी तीन प्रमुख महिलांची नावे चर्चेत आहेत.
निर्मला सीमारमण
अर्थमंत्री निर्मला सीमारमण यांनी पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम केले आहे. तसेच केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी त्यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे. त्यांनी नुकतीच पक्ष मुख्यालयात जे.पी.नड्डा आणि महासचिव बी.एल.संतोष यांच्यासोबत बैठक घेतली. दक्षिण भारतातून त्या येत असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून भाजपसाठी दक्षिणेचे द्वारही उघड होणार आहे.
डी. पुरंदेश्वरी
आंध्र प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष डी. पुरंदेश्वरी या एक अतिशय अनुभवी आणि बहुभाषिक नेत्या आहेत. त्यांना अनेक राजकीय पक्षांसोबत काम करण्याचा अनुभव आहे. पक्षात त्यांची व्यापक स्वीकृती आहे. त्यांना ऑपरेशन सिंदूरनंतर राबवलेल्या आंतरराष्ट्रीय अभियानातही सहभागी करून घेण्यात आले होते.
वनाथी श्रीनिवासन
तमिळनाडूतील कोइम्बतूर दक्षिण मतदारसंघाच्या आमदार वनाथी श्रीनिवासन यांचे नाव चर्चेत आहेत. त्या भाजप महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. १९९३ पासून भाजपशी संबंधित आहेत. त्यांनी संघटनेत अनेक पदे भूषवली आहेत. २०२२ मध्ये त्या केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्य झाल्या.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महिला राष्ट्रीय अध्यक्षाच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. एका महिलेकडे पक्षाचे नेतृत्व दिल्यामुळे ३३ आरक्षण विधेयक भावनेशी हा निर्णय सुसंगत असणार आहे. त्याचा प्रभाव पुढील लोकसभा निवडणुकीत दिसून येईल.
