भाजप कार्यकर्त्याचा सांगाडा 4 वर्षानंतर कब्रस्तानातून बाहेर; मोठं रहस्य उलगडणार?
पश्चिम बंगालच्या 2021 निवडणुकीनंतरच्या हिंसाचारात मृत्यू पावलेले भाजप कार्यकर्ते आस्तिक चंद्र दास यांचा सांगाडा चार वर्षांनी संदेशखालीतून बाहेर काढला. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी आणि हिंसाचाराचे सत्य उघड करण्यासाठी फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.

पश्चिम बंगालच्या 2021च्या विधानसभा निवडणुकीत मोठी हिंसा झाली होती. या हिंसेत भाजपच्या कार्यकर्त्याचाही मृत्यू झाला होता. आता चार वर्षानंतर भाजपच्या या कार्यकर्त्याचा सांगाडा कब्रस्तानातून बाहेर काढण्यात आला आहे. हा सांगाडा पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. हिंसे मागच्या कारणांचा उलगडा करण्यासाठी आणि या कार्यकर्त्याचा मृत्यू नेमका कसा झाला? हे शोधण्यासाठी हा सांगाडा बाहेर काढण्यात आला आहे.
उत्तर 24 परगना जिल्ह्यातील संदेशखाली येथील हे प्रकरण आहे. आस्तिक चंद्र दास असं या भाजपच्या मृत कार्यकर्त्याचं नाव आहे. तो संदेशखालीच्या झांझनिया गावचा रहिवाशी आहे. निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात त्याचा मृत्यू झाला होता. आता त्याच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठीच त्याचा सांगाडा बाहेर काढण्यात आला आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोर्टाच्या आदेशानंतर हा सांगाडा काढला आहे. मॅजिस्ट्रेट आणि मृतकाच्या कुटुंबींयांच्या उपस्थितीत हा सांगाडा काढण्यात आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आलं आहे.
जबरदस्ती दफनविधीचा आरोप
2021च्या निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी विजयी रॅली काढली होती. यावेळी टीएमसी समर्थकांनी आस्तिक चंद्र दास यांच्यावर हल्ला केला होता. त्यात आस्तिक गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
आस्तिक यांचा मुलगा सुब्रत दास यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले होते. वडील गंभीर जखमी झाल्यानंतर मी त्यांना रुग्णालयात घेऊन जायला निघालो. पण मला मध्येच अडवण्यात आले. त्यामुळे त्यांना उपचार मिळाला नाही आणि त्यांनी वाटेतच जीव सोडला, असा आरोप सुब्रत यांनी केला आहे. तसेच, घटना घडल्यानंतर आमच्या घराच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर पोस्टमार्टम न करताच वडिलांचा मृतदेह दफन करण्यास मजबूर करण्यात आले होते, असा आरोपही दास यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
भाजपची प्रतिक्रिया काय?
राज्यातील प्रशासकीय बदल झाल्यानंतर दास कुटुंबीयांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने हे आदेश जारी केले होते. या संपूर्ण प्रकरणावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2021च्या निवडणुकीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर कशा पद्धतीने हल्ले करण्यात आले होते, याचं हे प्रकरण जिवंत उदाहरण आहे. त्यावेळी पोलीस मूकदर्शक बनून उभी होती. पण दोषींना शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असा विश्वास समिक भट्टाचार्य यांनी व्यक्त केला. दरम्यान, दास यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची आणि गरज पडल्यास दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संदेशखालीत झालेल्या या घटनेनंतर पुन्हा एकदा येथील राजकीय वातावरण तापलं आहे.
