टेकऑफनंतर दोन्ही इंजिन बंद, एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशी अहवालात धक्कादायक खुलासे
Ahmedabad Air India Plane Crash: एएआयबीच्या अहवालात कॉकपिटमधील पायलटचा संवाद समोर आला आहे. कॉकपिट व्हॉयस रिकॉर्डर (सीव्हीआर) नुसार, पायलट सुमीत सभरवाल याने दुसरा पायलट कुंदर याला विचारले, तू इंजिन का बंद केले?

Ahmedabad Air India Plane Crash Investigation Report: अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल आला आहे. अपघाताच्या महिन्याभरानंतर आलेल्या या अहवालात धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने हा अहवाल दिला आहे. त्यानुसार, टेकऑफ झाल्यानंतर विमानाचे दोन्ही इंजिन काही सेकंदात बंद पडल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच विमानाचा अपघात झाल्याचे म्हटले आहे. हा अहवाल प्राथमिक आहे. सध्या अपघाताची सविस्तर चौकशी सुरू आहे, असेही तपास अहवालात म्हटले आहे.
इंजिनाचा इंधन पुरवठा बंद
AAIB ने 15 पानांचा अहवाल दिला आहे. त्यात म्हटले आहे की, विमानाने सकाळी 08:08 वाजता 180 नॉट्सची कमाल इंडिकेटेड एअरस्पीड घेतली होती. त्यानंतर लगेचच, इंजिन-1 आणि इंजिन-2 चे इंधन कट-ऑफ स्विच (जे इंजिनांना इंधन पाठवतात) ते ‘RUN’ वरून ‘CUTOFF’ परिस्थितीत गेले. फक्त एका सेंकदात हे घडले. त्यामुळे इंजिनमध्ये इंधन येणे बंद झाले. त्यानंतर दोन्ही इंजिन N1 व N2 रोटेशन स्पीड वेगाने निकामी झाले.
पायलटमधील संवाद आला समोर
AAIB च्या अहवालात कॉकपिटमधील पायलटचा संवाद समोर आला आहे. कॉकपिट व्हॉयस रिकॉर्डर (सीव्हीआर) नुसार, पायलट सुमीत सभरवालने दुसरा पायलट कुंदर याला विचारले, तू इंजिन का बंद केले? त्यानंतर दुसऱ्याने उत्तर दिले, मी काहीच केले नाही. दोन्ही पायलटमधील संवादामुळे फ्यूल कटऑफ कोणी जाणीवपूर्वक केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु अहवालात म्हटले आहे की, आतापर्यंतच्या तपासात असे काहीही आढळले नाही की, ज्यामुळे बोईंग विमान किंवा त्याच्या इंजिन उत्पादक कंपनीला कोणताही इशारा देण्याची आवश्यकता आहे.
Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) releases Preliminary Report on Air India B787-8 flight crash at Ahmedabad on 12 June 2025#AhmedabadPlaneCrash pic.twitter.com/rhzNquNn7M
— ANI (@ANI) July 11, 2025
अपघातात 260 जणांचा मृत्यू
एअर इंडियाच्या विमानाचा 12 जून रोजी अपघात झाला होता. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरुन लंडन जाण्यासाठी टेकऑफ घेतले होते. विमान टेकऑफ घेतल्यानंतर काही सेंकदात मेडिकल कॉलेजच्या हॉस्टल परिसरात क्रॅश झाले. या अपघातात विमानातील 241 जणांसह 260 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक व्यक्ती वाचला. विमानात 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, एक कॅनडाचा नागरिक तर 7 पोर्तुगाल नागरिक होते.
