CIA चे हिमालयातील ते गुप्त मिशन, 60 वर्षानंतरही भारतासाठी का आहे धोकादायक ?
ही कहाणी शीतयुद्धात १९६५ साली अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएच्या अपयशाची आहे. ज्यापासून भारताला इतकी वर्षे झाला तरी धोका असल्याचे म्हटले जात आहे.

साल १९६५ चा तो काळ होता. त्यावेळी अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तात शीतयुद्ध सुरु होते. चीनने आपली पहिली अणूचाचणी करुन जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. अमेरिका आणि भारत चीनच्या वाढत्या ताकदीने चिंतेत होते. त्यातून गुप्त मिशनचा जन्म झाला. जे मिशन आजही अनेक शंका आणि कुशंकेने घेरले असून हिमालयाच्या कुशीत दफन झालेले आहे. ही कहाणी आहे हिमालयाचे दुर्गम शिखर नंदादेवी शिखरावरील CIA ने सोडलेल्या एका आण्विक उपकरणाची जे आजपर्यंत सापडलेले नसून त्याच्या रेडिएशनचा धोका आजही कायम आहे.
वास्तविक CIA ने चीनच्या मिसाईल आणि आण्विक कार्यक्रमावर नजर ठेवण्यासाठी एक गुप्त योजना आखली होती.त्यांना हिमालयाच्या शिखरावर एका गुप्त टेहळणी केंद्राची निर्मिती करायची होती. ज्याचा उद्देश रेडीओ सिग्नल पकडणे हा होता. यासाठी अणू ऊर्जेवर संचालित एका SNAP-19C नावाच्या पोर्टेबल आण्विक जनरेटर वापर केला जाणार होता, जे प्लुटोनियमने चालते.या तंत्राचा वापर अंतराळ मोहिमा आणि खोल समुद्रात केला जातो.
CIA चे सिक्रेट मिशन
या मिशनला तडीस नेण्यासाठी CIA ने निवडक अमेरिकन गिर्यारोहकांची निवड केली. आणि भारतीय गुप्तचर एजन्सीच्या मदतीने नंदादेवी शिखरावर चढाई केली. त्या भारतीय पथकाचे नेतृत्व कॅप्टन एम.एस. कोहली करत होते. ते त्याकाळी भारताचे मुख्य गिर्यारोहक होते. हे मिशन गुप्त असल्याने खूपच कमी लोकांना याची माहिती होती.
ऑक्टोबर १९६५ रोजी ही टीम शिखराच्या जवळ कॅम्प फोरपर्यंत पोहचली होती. परंतू अचानक बर्फाचे वादळ आले. परिस्थिती प्राणघातक झाली. कॅप्टन कोहली यांनी गिर्यारोहकांचे प्राण वाचण्यासाठी मोठा निर्णय घेतला. त्यांनी ती उपकरणे तेथेच सोडून खाली परतण्याचा आदेश दिला. त्यानंतर सुमारे ५० किलो वजनाच्या या परमाणू जनरेटरला बर्फात सुरक्षितपणे बांधून ठेवण्यात आले. परंतू दुसऱ्या वर्षी ही टीम तेथे पोहचली तर ते गायब झाले होते.
भारताची चिंता काय ?
असे म्हटले जाते कदाचित हिमस्खलनात हे आण्विक जनरेटर बर्फाच्या खाली ग्लेशियरमध्ये गडप झाले असावी. यानंतर अनेकदा शोध मोहिमा घेण्यात आल्या. रेडिएशन डिटेक्टर, इंफ्रारेड सेंसर आणि अन्य उपकरणांनी शोध घेऊनही काहीच हाती लागले नाही. अमेरिकन आणि भारतीय अधिकारी त्यामुळे हादरले. परंतू या घटनेला दोन्ही सरकारांनी दाबून टाकत गुप्तच ठेवले.
१९७० च्या दशकात हे प्रकरण मीडियात आले.तेव्हा भारतात राजकीय विरोध झाला. नंदादेवी हिम शिखरातील ग्लेशियर गंगा नदीच्या उपनद्यांना जन्म देतात. जर प्लुटोनियम पाण्यात गेले तर करोडो लोकांच्या जीवनाला धोका होता. परंतू सरकारी समित्या आणि संशोधकांनी यापासून काही धोका नाही असे म्हटले तरीही धोका कायम असून भीती कायम आहे.
अमेरिकेने जबाबदारी घ्यावी
आज ६० वर्षानंतरही हे उपकरण हिमालयाच्या बर्फातच कुठेतरी दबलेले आहे. ग्लोबल वार्मिंग आणि ग्लेशियर वितळत असल्याने हे उपकरण बाहेर पडण्याची भीती आजही कायम आहे. स्थानिक नागरिक, पर्यावरण वादी आणि काही राजकीय नेत्यांनी अमेरिकेने जबाबदारी स्विकारत हे उपकरण शोधून काढावे अशी मागणी केली होती. आता मिशन नंदादेवी केवल एक गुप्तचर मोहिम फसल्याची कहाणीच नसून शीत युद्धाचा एक असा वारसा आहे. जो आजही भारताच्या पर्वतात आणि लोकांच्या मनात दहशत बनून जीवंत आहे.
