Abhijeet Dipke : आम आदमी पार्टीशी संबंध काय? अभिजित दीपकेंनी पहिल्यांदाच गुपित फोडलं; म्हणाले माझे मित्र…
आप पक्षात माझे खूप मित्र आहेत. त्यांच्या मी संपर्कात आहे. पण पार्टीचा आणि माझा काहीही संबंध नाही, असं म्हणत दीपके यांनी आप पार्टी आणि सीजेपीचा संबंध असल्याच्या चर्चा फेटाळल्या.

Abhijeet Dipke : कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके आता छत्रपती संभाजीनगरातील आपल्या घरी आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्याच नेतृत्त्वात झालेल्या दिल्लीतील आंदोलनामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला. त्यांच्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, आता सीजेपीचे आंदोलन संपलेले आहे. परंतु त्यांच्या आंदोलनावर तसेच दीपके यांच्यावरही वेगवेगळे आरोप केले जात आहेत. दीपके यांना आम आदमी पार्टीचा पाठिंबा आहे. आम आदमी पार्टीने सहकार्य केल्यामुळेच दीपके यांनी हे आंदोलन उभे केले, असा आरोप केला जातोय. यावरच आता दीपके यांनी सविस्तर सांगितलं आहे.
मला आम आदमी पार्टीकडून…
टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी दीपके यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत दीपके यांनी त्यांची राजकीय भूमिका आणि आम आदमी पार्टीशी त्यांचा संबंध यावर भाष्य केलं. छत्रपती संभाजीनगरातील शिक्षण संपल्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी पुण्यात शिक्षणाला गेलो. त्यानंतर मला आम आदमी पार्टीकडून इंटर्नशीपची ऑफर आली. मी पुढे त्यांच्यासोबत २०२२ ते २०२३ सालापर्यंत काम केलं. त्यांचं हेल्थ आणि एज्युकेशन मॉडल मला आवडलं. जातीधर्माचं राजकारण न करता त्यांनी काम केलं. ते मला आवडलं. दिल्लीत दोन तीन वर्ष काम केलं, अशी माहिती दीपके यांनी दिली. तसेच आता माझा आम आदमी पक्षाशी काहीही संबंध नाही. कॉकरोच जनता पार्टीचाही आप पक्षाशी संबंध नाही, असे स्पष्टीकरण दीपके यांनी दिले. तसेच आप पक्षात माझे खूप मित्र आहेत. त्यांच्या मी संपर्कात आहे. पण पार्टीचा आणि माझा काहीही संबंध नाही, असं म्हणत त्यांनी आप पार्टी आणि सीजेपीचा संबंध असल्याच्या चर्चा फेटाळल्या.
सुजात आंबेडकर यांना उत्तर
वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी अभिजीत दीके हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बी टीम आहे, असा दावा केला होता. त्यावर बोलतान सगळ्यांनी एकदा एकत्र बसावे. अगोदर एकत्र बसा आणि मग माझ्यामागे कोण आहे. मी कुणाची बी टीम आहे, ते ठरवावे. तुमचे ठरल्यानंतर मला सांगावे त्यानंतर मी उत्तर देतो, असं प्रत्युत्तर दीपके यांनी दिले.
