
भारतविरोधी दशतवादी संघटनांनी भारतीय परिवारातील अनेक माता-भगिनींचे सिंदूर पुसले होते. त्या दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने चांगलाच धडा शिकवला आहे. भारताचे हे ऑपरेशन सैन्य शक्ती दाखवणारे आहे. आता दहशतवादी आणि दहशतवाद्यांच्या आकांसाठी सीमापलीकडील जमीनसुद्धा सुरक्षित नाही. भारताने पाकिस्तानात घुसून कारवाई केली आहे. भारतीय सैन्याने शौर्य आणि प्रचंड पराक्रम दाखवत रावळपिंडीपर्यंत मजल मारली. भारतात दहशतवादी घटना करणाऱ्यांची काय परिस्थिती होईल, हे आता जगाने पाहिले आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगत दहशतवाद्यांवर ठोस कारवाई सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
ब्राह्मोस एयरोस्पेस इंटीग्रेशन आणि टेस्टिंग फॅसिलिटी सेंटरचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्हर्जिअल पद्धतीने केले. यावेळी ते म्हणाले, उद्घाटनासाठी मी स्वत: येणे आवश्यक होते. पण देशात जी परिस्थिती सुरु आहे. त्यामुळे मी दिल्लीत थांबलो. संरक्षण क्षेत्रात भारताला पुढे नेण्यासाठी ब्राह्मोस फॅसिलिटी सेंटर महत्वाचे असणार आहे.
ब्राह्मोसबाबत बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, ब्राह्मोस सुपरसोनिक क्षेपणास्त्र आहे. ध्वनीच्या वेगाहून अधिक वेग हे क्षेपणास्त्र जाते. हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाज, विमान, अथवा जमिनीवरून डागण्यात येऊ शकते. भारत आणि रशियाच्या तंत्रज्ञानाचे हे संगम आहे. या तंत्रज्ञानाच्या संगमासाठी आता लखनऊ सुद्धा ओळखला जाणार आहे. या क्षेपणास्त्राची एका ठिकाणी निर्मिती शक्य होत नाही. त्याच्या निर्मितीसाठी खूप कुशल कामगार लागतात.
शक्तीचा गौरव करताना राजनाथ सिंह म्हणाले, जग कमकुवत लोकांचा नाही तर नेहमी शक्तीचा गौरव करते. सन्मान करते. भारताने संरक्षण क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर या सूत्राने आपण पुढे जात आहोत. आपण निर्मितीसोबत निर्यातसुद्धा करणार आहे. कारण शस्त्रास्त्रांची ही बाजारपेठ खूप मोठी आहे. त्यामुळे दर्जेदार संरक्षण उत्पादने निर्माण करण्यासाठी आपणास पुढे जायचे आहे, असे त्यांनी म्हटले.