“आम्ही आणखी जोमाने काम करु आणि दिल्लीतील लोकांची…” निकालानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
तब्बल 27 वर्षानंतर नवी दिल्लीत भाजपचे कमळ फुलले आहे. या निकालानंतर दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. दिल्लीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुका पार पडल्या. भाजप विरुद्ध आप अशा अटीतटीच्या लढतीत भाजपचा विजय झाला. नवी दिल्लीत भाजपने तब्बल 47 जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे तब्बल 27 वर्षानंतर नवी दिल्लीत भाजपचे कमळ फुलले आहे. या निकालानंतर दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. दिल्लीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी आता आम्ही आणखी जोमाने दिल्लीतील लोकांची सेवा करु, असे आश्वासन संपूर्ण दिल्लीतील जनतेला दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
“जनशक्ती सर्वेपरि! विकासाचा विजय झाला. सुशासन जिंकले. दिल्लीतील सगळ्या भावा-बहिणींनी आम्हाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला, त्यासाठी मी त्यांचे वंदन करतो आणि अभिनंदनही. तुम्ही आम्हाला जो आशीर्वाद आणि प्रेम दिले आहे, त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. आम्ही दिल्लीचा चौफेर विकास करु. तसेच दिल्लीतील लोकांचे जीवन उत्तम बनवण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. ही आमची गॅरेंटी आहे. यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीत दिल्लीची भूमिका महत्त्वाची असेल, असे आम्ही आश्वस्त करतो.
मला भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांवर गर्व आहे. त्यांनी या विजयासाठी दिवस रात्र मेहनत केली. आता आम्ही आणखी जोमाने आणि मजबुतीने दिल्लीतील लोकांची सेवा करु”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
जनशक्ति सर्वोपरि!
विकास जीता, सुशासन जीता।
दिल्ली के अपने सभी भाई-बहनों को @BJP4India को ऐतिहासिक जीत दिलाने के लिए मेरा वंदन और अभिनंदन! आपने जो भरपूर आशीर्वाद और स्नेह दिया है, उसके लिए आप सभी का हृदय से बहुत-बहुत आभार।
दिल्ली के चौतरफा विकास और यहां के लोगों का जीवन उत्तम…
— Narendra Modi (@narendramodi) February 8, 2025
अनेक दिग्गजांचा पराभव
दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’च्या अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल हे पराभूत झाले आहे. भाजपच्या परवेश वर्मा यांनी 3186 मतांनी केजरीवाल यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आपच्या गोटात मोठा भूकंप झाला आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला आहे.