Explainer : आदिवासी यांची जोडीदार शोधण्याची ही ‘घोटुल’ प्रथा माहित आहे का?
आदिवासींची 'घोटुल' (Ghotul) ही प्रथा एक आदर्श नागरिक घडवणारी ती संस्था आहे. स्वच्छता, शिस्त, कठोर परिश्रम, मोठ्या व्यक्तींचा आदर, सन्मान, स्वतःविषयी आणि समाजाविषयी स्वाभिमान जपणे ह्या गोष्टींचे देखील मार्गदर्शन केले जाते.

मुंबई | 25 डिसेंबर 2023 : आदिवासी समाजात घोटुलला (Ghotul) अनन्यसाधारण महत्व आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील बस्तर जिल्हा येथील आदिवासी भागात घोटुल प्रथा ही आजही प्रचलित आहे. ही प्रथा मुरीया (Murias) आणि माडिया गोंड (Madia Gond) संस्कृतीचा महत्वाचा भाग मानली जाते. आदिवासी सभ्यता आणि संस्कृतीचा वारसा चालवणारी, तिचे संवर्धन करणारी ही एक सामाजिक व्यवस्था मानली जाते. प्राचीन काळापासून ही प्रथा चालत आली आहे. विशेष म्हणजे गोंड संस्कृतीत तिला धार्मिक मान्यता आहे. ‘घोटुल’ प्रथेबद्दल अनेक गैरसमज आहेत. परंतु, एक आदर्श नागरिक घडवणारी ती संस्था आहे.
‘घोटुल’ म्हणजे नेमके काय?
आदिवासींची विशिष्ट आकाराची झोपडी किंवा घर म्हणजे ‘घोटुल’. माती किंवा लाकडाने चौकोनी अथवा गोलाकार अशी तयार केलेली ही झोपडी. तिचे साधारण दोन भाग असतात. घोटुलसमोर बरीच मोठी मोकळी जागा असते. सभोवताली कुंपण असून त्याला दरवाजा असतो. मोकळ्या जागेत एक लाकडी खांब असतो. तर, झोपडी, घराच्या भिंतींवर चित्रे काढलेली असतात. अंगणात पाय धुण्यासाठी किंवा अंघोळीसाठी एक मोठा दगड ठेवलेला असतो. सर्वसाधारणपणे घोटुल हे गावापासून दूर असतात. पण, काही घोटुल गावाच्या मध्यभागीही असतात.
समाज व्यवस्थेत घोटुलची भूमिका महत्त्वपूर्ण
आदिवासी समाज व्यवस्थेत घोटुलची भूमिका महत्वाची राहिली आहे. आदिवासी युवकांच्या भावना जपणारे आणि जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य बहाल करणारे ते एक सामाजिक मान्यता प्राप्त ठिकाण आहे. गोंडांचे धर्मगुरू लिंगो यांनी घोटुलची स्थापना केली. ही एक प्रकारची न्याय व्यवस्था आहे. सायंकाळी सर्व कामे आटोपून अविवाहित तरुण तरुणींचे पाय घोटूलकडे वळतात. येथे त्यांचे समूह नृत्य होते. त्यांच्या वागण्यात मोकळेपणा असतो. मुलींची थट्टा मस्करी केली जाते. यातूनच त्यांच्या भावी जीवनाचा साथीदार निवडला जातो.
घोटुलमध्ये तरुण मुले-मुली काय करतात?
एखाद्या मुलाला शारीरिकदृष्ट्या प्रौढ झाल्याची जाणीव होते. त्यावेळी तो घोटुलचा मार्ग निवडतो. त्याला बांबूपासून एक कंगवा तयार करावा लागतो. आपले सर्व कौशल्यपणाला लावून तो कंगवा बनवतो. कारण हाच कंगवा त्याच्या भावी आयुष्याचा जोडीदार निवडून देणारा असतो. ज्या मुलीला तो कंगवा आवडतो ती तो चोरते आणि आपल्या केसात घालून फिरते. त्या मुलावर तिचे प्रेम आहे हे या कृतीमधून कळते. ते दोघे मिळून मग त्यांचे घोटुल सजवतात. एकाच झोपडीत राहू लागतात.
वैवाहिक जीवनाची शिकवणी
घोटूलमध्ये राहणाऱ्या अविवाहित मुलाला ‘चेलिक’ (Cheliks) तर कुमारिकेला ‘मोटियारी’ (Motiaris) म्हणतात. ‘सीरदार’ हा घोटुलचा प्रमुख असतो. त्याच्या आज्ञेचे प्रत्येकाला पालन करावे लागते. घोटुलमधील सदस्यांना तो कामे वाटून देतो. घोटुलमध्ये एकत्र राहिल्यानंतर ते जोडपे स्वतःहून वैवाहिक जीवनाशी संबंधित स्वतःची शिकवणी घेतात. एकमेकांच्या भावना समजून घेणे ते शारीरिक गरजा पूर्ण करणे याचा यात समावेश असतो. ज्यांनी एकमेकांवर प्रेम असल्याचं जाहीर केलं आहे असेच जोडपे घोटुलमध्ये एकत्र राहू शकतात.
आदिवासी समाजामध्ये स्त्रियांचा सन्मान, तिचा आदर या गोष्टींना फार महत्व आहे. त्यांना समानतेचा अधिकार देण्यात आला आहे. स्त्रियांना स्वतंत्र आणि स्वच्छंदी जीवन जगता यावे, अशी येथील संस्कृती आहे. यातच ‘घोटुल’ संस्थेला धार्मिक अधिष्ठान प्राप्त आहे. त्यामुळे येथे कोणतेही अनैतिक कृत्ये करण्यास वाव नाही. तसे केल्यास संबधित व्यक्तीला प्रसंगी समाजाबाहेर काढले जाते.
ही परंपरा बंद होण्याच्या मार्गावर
आदिवासी समाजाने वर्षानुवर्ष जपलेली ही परंपरा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. बाहेरच्या जगाने प्रवेश केल्यामुळे घोटूलचा खरा चेहरा आता बिघडत चालला आहे. बाहेरील लोक येऊन फोटो काढतात. व्हिडीओ फिल्म्स बनवतात. त्यामुळे आदिवासींच्या या प्रथा आणि परंपरा यावर घाला बसत आहे. नक्षली कारवाया करणारे माओवादी यांनाही ही परंपरा पसंद नाही. अनेक ठिकाणी त्यांनी ‘ऑर्डर’ काढून या प्रथेवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला आहे. तरुण मुला-मुलींना इतके स्वातंत्र्य देणे योग्य नाही. या परंपरेचा गैरवापर होत आहे. मुलींचे शारीरिक शोषण होत आहे असे त्यांचे मत आहे. अनेक भागात ही परंपरा पूर्णपणे थांबलेली नाही. परंतु, ती काही प्रमाणात कमी होत आहे हे मात्र नक्की.
