
भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये अशी अमेरिकेची भूमिका आहे. चीन आणि भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतात, तो पैसा रशिया युक्रेनविरोधात युद्धासाठी फंड म्हणून वापर करत असल्याचा आरोप वारंवार अमेरिकेकडून करण्यात येत आहे, दरम्यान अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर पहिल्यांदाच रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन भारताच्या दौऱ्यावर आले होते. व्लादीमीर पुतिन यांच्या या दौऱ्याकडे अमेरिकेसह जगाचं लक्ष लागलं होतं. पुतिन यांचा हा दौरा अनेक अर्थानं महत्त्वाचा होता. या दौऱ्यादरम्यान भारतानं अमेरिकेचा टॅरिफ दबाव झुगारून रशियासोबत अनेक महत्त्वाचे करार केले आहेत. रशिया आणि भारताची वाढत असलेली जवळीक ही अमेरिकेसाठी आता डोकेदुखीचा विषय ठरली आहे. तर दुसरीकडे भारत दौऱ्यावर असताना पुतिन यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. भारताला आपण कधीही कच्च्या तेलाचा पुरवठा कमी पडू देणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. हा अमेरिकेसाठी मोठा झटका मानण्यात येत आहे.
दरम्यान पुतिन भारत दौऱ्यावर असतानाच अमेरिकेनं आपली एनएसएस, राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर केलं, त्यामध्ये भारत हा आपला एक महत्त्वाचा भागीदार देश असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच आता अमेरिकेनं भारताला मोठा झटका दिला आहे. अमेरिकेकडून H1-B व्हिसासाठी भारतीय अर्जदारांच्या अपॉइंटमेट तारखा पोस्टपॉन्ड करण्यात आल्या आहेत. भारतामधील अमेरिकेच्या दूतावासाने ट्विटरवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. यामुळे आता अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांचं मोठं नुकासन होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या भारतातील दूतावासानं दिलेल्या माहितीनुसार या तारखा आता 2026 पर्यंत पोस्टपॉन्ड करण्यात आल्या आहेत.
अमेरिकेकडून H1-B आणि H-4 व्हिसासाठी आता नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या नव्या नियमानुसार ज्यांनी एच1बी व्हिसासाठी अर्ज केला आहे, त्या सर्वांचे सोशल मिडिया अकाउंट जसं की फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन यासारख्या सर्व अकाऊंट्सची कडक तपासणी करण्यात येणार आहे, ही प्रक्रिया 15 डिसेंबरपासून सुरू होणार होती, मात्र आता अचानक ही प्रक्रिया पोस्टपॉन्ड करण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे.