एल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टातही दिलासा नाहीच

एल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टातही दिलासा नाहीच

नवी दिल्ली : एल्गार परिषदेप्रकरणी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टानेही नकार दिलाय. चार आठवड्यांसाठी अटकेपासून अंतरिम संरक्षण त्यांना देण्यात आलंय. एल्गार परिषद आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराचा तपास अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात असताना एफआयआर रद्द करणं चुकीचं असेल, असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं.

सरन्यायाधीश रंजन गोगोई, जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस एस. के. कौल यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली. तेलतुंबडे यांच्याकडे खालच्या न्यायालयात जामीनाचा मार्ग मोकळा असेल, असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं.

21 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने आनंद तेलतुंबडे यांचा एफआयआर रद्द करण्याची मागणी फेटाळली होती. शिवाय अटकेपासून तीन आठवड्यांसाठी संरक्षण दिलं होतं. यानंतर आनंद तेलतुंबडे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. वाचाएल्गार परिषद प्रकरणी दोषारोपपत्र दाखल, कुणावर काय आरोप?

पुणे शहरात शनिवारवाडा प्रांगणात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद झाली. या परिषदेसाठी चार ते पाच महिने सुरु असलेली पूर्वतयारी आणि परिषदेत झालेली भडकाऊ भाषणांमुळे कोरेगाव भिमा येथे एक जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला. त्या हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

कोण आहेत आनंद तेलतुंबडे?

पुणे पोलिसांनी शहरी नक्षलवादाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांच्यासह 21 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. तेलतुंबडे सध्या गोव्यातील एका संस्थेत सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पुणे पोलिसांनी 28 ऑगस्टला तेलतुंबडे यांच्या पुणे येथील घरावर छापा मारला होता. मात्र या छाप्यात काहीही हाती लागलं नाही. हा छापा नसून औपचारिक भेट असल्याचं यावर बोलताना सरकारी वकिलांनी सांगितलं होतं. वाचाएल्गार परिषद : कवी वरावर राव यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी

तूर्तास तेलतुंबडे यांना अटक करण्याची गरज नसली, तरी गुन्ह्यातून त्यांचं नाव वगळण्यास सरकारी वकिलांकडून जोरदार विरोध करण्यात आला. कॉ. प्रकाश यांच्याकडे सापडलेली पत्र आणि रोना विल्सन यांच्या लॅपटॉपमधील डेटाच्या आधारावर तेलतुंबडे आणि इतर सर्वांविरुद्ध सबळ पुरावे असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टात यापूर्वी सांगितलं होतं. वाचा – एल्गार परिषदेतील चिथावणीखोर भाषणांमुळे कोरेगाव भीमा हिंसाचार उफाळून आला : पुणे पोलीस

आनंद तेलतुंबडे यांचे बंधू मिलिंद तेलतुंडबे यांना ‘कॉम्रेड एम’ या नावाने संबोधलं जात असल्याचाही दावा करण्यात आलाय. मिलिंद तेलतुंबडे हे या प्रकरणात वॉन्टेड आहेत. मात्र आनंद तेलतुंबडे यांचा त्यांच्या भावाशी गेली 26 वर्षे कोणताही संपर्क नसल्याचा दावा करण्यात येतोय. 6 डिसेंबर रोजी पुणे पोलिसांनी पाच संशयितांच्या विरोधात जे दोषारोपपत्र दाखल केलंय, त्यात मिलिंद तेलतुंबडे यांचंही नाव आहे.

Published On - 12:30 pm, Mon, 14 January 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI