मोदी पंतप्रधान झाल्यापासून भाजपच्या विजयाचा वाढता आलेख, तब्बल 22 राज्यांमध्ये सत्ता, 1798 आमदार
मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचा पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजय झाला आहे. भाजपने ममता बॅनर्जी यांच्या गडाला सुरुंग लावला आहे. पश्चिम बंगालच्या या विजयासह आता देशातील तब्बल 22 राजांमध्ये भाजपची सत्ता आली आहे.

आज पाच राज्याच्या निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. पुन्हा एकदा भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सर्व देशाचं लक्ष हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे लागलं होतं. ही निवडणूक भाजप आणि तृणमूल काँग्रेससाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. मात्र या निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला जवळपास 200 च्या आसपास जागा मिळण्याची शक्यात आहे. तर तृणमूल काँग्रेसची 100 चा आकडा गाठताना देखील चांगलीच दमछाक झाली आहे. आता भाजपची आणखी एका राज्यात सत्ता आली आहे. दरम्यान दुसरीकडे भाजपने आसाममध्ये विजयाची हॅट्रीक केली आहे. आसाममध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. पुडुचेरीमध्ये देखील भाजपची वाटचाल स्पष्ट बहुमताच्या दिशेनं सुरू आहे.
22 राज्यांमध्ये सत्ता
दरम्यान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून सातत्याने भाजपच्या विजयाचा आलेख वाढतानाच दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या विजयानंतर आता देशातील तब्बल 22 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली आहे. त्यापैकी 17 राज्यांमध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे तर 5 राज्यांमध्ये भाजप प्रणित एनडीएचा मुख्यमंत्री आहे.

आमदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ
दरम्यान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून भाजपच्या आमदारांच्या संख्येमध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे. मोदी दिल्लीच्या राजकारणात येण्यापूर्वी देशभरात भाजपच्या आमदारांची संख्या केवळ 773 एवढी होती. मात्र त्यामध्ये गेल्या 13 वर्षांमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. 2026 मध्ये आमदारांचा हा आकडा 1798 वर पोहोचला आहे. 2013 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये भाजपचे केवळ 2 आमदार होते. आता हा आकाडा 8 वर पोहोचला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये 2013 मध्ये भाजपचे फक्त 3 आमदार होते. 2026 मध्ये आमदाराचा आकडा 46 वर पोहोचला आहे. 2013 मध्ये आसामध्ये भाजपचे 5 आमदार होते, तर 2026 मध्ये आमदारांची संख्या 82 वर पोहोचली आहे.

बिहारमध्ये 2013 मध्ये भाजप आमदाराची संख्या 91 इतकी होती. तर 2026 मध्ये बिहारमध्ये भाजपचे 89 आमदार आहेत. छत्तीसगडमध्ये आमदारांची संख्या 50 वरून 54 वर पोहोचली आहे. दिल्लीमध्ये 2013 ला भाजपचे 23 आमदार होते, तर 2026 मध्ये आमदारांचा आकडा 48 वर पोहोचला आहे. गेव्यात पूर्वी आमदारांची संख्या 21 इतकी होती, गोव्यामध्ये आता आमदारांची संख्या 27 वर पोहोचली आहे. गुजरातमध्ये 115 आमदार होते आता राज्यात भाजपचे 161 आमदार आहेत. हरियाणामध्ये भाजपचे केवळ 4 च आमदार होते, आता हा आकाड 48 वर पोहोचला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पूर्वी भाजपचे 26 आमदार होते, सध्या स्थितीमध्ये या राज्यात भाजपचे 25 आमदार आहेत.
जम्मू आणि काश्मीरमध्ये 2013 मध्ये भाजपचे 11 आमदार होते, तर 2026 मध्ये आमदारांचा आकडा 29 वर पोहोचला आहे. झारखंडमध्ये पूर्वी भाजप आमदारांची संख्या 18 इतकी होती तर आता आमदारांची संख्या 21 वर पोहोचली आहे. कर्नाटकमध्ये पूर्वी 40 आमदार होते आता आमदारांची संख्या 64 वर पोहोचली आहे. केरळमध्ये तर भाजपला खातंही उघडला आलं नव्हतं, मात्र या निवडणुकीत भाजपचे तीन आमदार विजयी झाले आहेत. मध्य प्रदेशमध्ये पूर्वी 143 आमदार होते आता ही संख्या 165 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात 46 वरून आमदारांची संख्या तब्बल 131 वर पोहेचली आहे. मणिपूरमध्ये 2013 ला भाजपचा एकही आमदार नव्हता, मात्र आता ही संख्या 36 वर पोहोचली आहे. मेघालयामध्ये भाजपचे 2 आमदार आहेत. मिझोरममध्ये भाजपचे 2 आमदार आहेत. पूर्वी या राज्यांमध्ये भाजपला खातंही उघडता आलं नव्हतं. नागालँडमध्ये पूर्वी भाजपचा एकच आमदार होता. आता भाजपचे तब्बल 11 आमदार आहेत.
ओडिशामध्ये पूर्वी भाजपचे 6 आमदार होते, आता आमदारांचा आकडा 79 वर पोहोचला आहे. पंजाबमध्ये पूर्वी भाजपचे 12 आमदार होते, आता सध्या राज्यात भाजपचे 2 आमदार आहेत. राजस्थानमध्ये पूर्वी भाजपचे 78 आमदार होते, आता आमदारांची संख्या 118 वर पोहोचली आहे. तेलंगणामध्ये भाजपचे सात आमदार आहेत. तर त्रिपुरामध्ये भाजपचे 32 आमदार आहेत. उत्तर प्रदेशामध्ये 2013 मध्ये भाजपचे 47 आमदार होते, आता आमदारांचा आकडा 257 वर पोहोचला आहे. उत्तराखंडमध्ये भाजपचे 47 आमदार आहेत. तर यावेळी पश्चिम बंगालमध्ये भाजपला 200 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.
